सांगली : अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे जिल्ह्यातील ११६ गावे बाधित झाली असून, साडेआठ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार १४५ नागरिकांचे स्थलांतर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात शिराळा वगळता अन्य ठिकाणी शनिवारी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी विविध धरणांतून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे येत्या २४ तासांत कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये एक ते दोन फुटांनी वाढ अपेक्षित असून, नदीकाठी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. हेही वाचा.चिपळूणमधील बनावट नोटा प्रकरण रत्नागिरीपर्यंत पोहोचले; आणखी एक जण ताब्यात शुक्रवारी रात्रीपासून आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ३९ फूट १० इंचावर स्थिर आहे. तथापि, सातारा जिल्ह्यात दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोयनेतून ५२ हजार १०० आणि चांदोली धरणातून ११ हजार ५३९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. पडणारा पाऊस, धरणातून होत असलेला विसर्ग यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ गृहीत धरून नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, की अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे ११६ गावांतील ८ हजार ५५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचा आदेश दिला आहे. राज्य मार्ग ५, प्रमुख जिल्हा मार्ग २१ व ग्रामीण मार्ग ११ पाण्याखाली गेले आहेत. आपत्तीचा सामना करण्यासाठी एन.डी.आर.एफ. पथक (३० जवान) ५ जूनपासून व एक सैन्य दल पथक (१०७ जवान) २६ जुलैपासून जिल्ह्यात तैनात आहे. त्यांच्या वतीने ठिकठिकाणी रंगीत तालीम घेण्यात आली आहे. हेही वाचा.Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे, औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत..”; देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी ६.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक २३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.