पावसाने दाणादाण

मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडी; राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडी; राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

मुंबई/रत्नागिरी/नागपूर/ जळगाव/औरंगाबाद/पुणे

पावसाने पुन्हा रुद्रावतार धारण करत मंगळवारी राज्यातील अनेक भागांना तडाखा दिला. मुंबईसह ठाण्यात सायंकाळनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी होऊन कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. कोकणात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भातही नद्यांना पूर आल्याने गोंदिया जिल्ह्य़ात चार जण बुडाले, तर यवतमाळमध्ये दोघे वाहून गेले. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतही जनजीवन विस्कळीत झाले.

मुंबईपरिसरात मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली. यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांसह कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल झाले.

कोकणात काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुरुडमध्ये मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४७५ मिमी पावसाची नोंद झाली. सुमारे सव्वा महिन्याच्या खंडानंतर रत्नागिरीत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चिपळूण, दापोलीत सर्वाधिक पाऊस झाला आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीचे पाणी जुना बाजार पुलापर्यंत गेल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र, या वेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक मंगळवारीच चिपळुणात दाखल झाले आहे. संगमेश्वरच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. राजापूर तालुक्यामध्ये संततधार पावसामुळे संभाव्य पूरस्थितीने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

विदर्भालाही पावसाने तडाखा दिला. गोंदिया जिल्ह्य़ातील आमगाव तालुक्यातील मुंडीपार येथे बाघ नदीच्या पात्रात चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्य़ात पुराच्या पाण्यात दोन युवक वाहून गेले.

बराच काळ पावसाने ओढ दिलेल्या मराठवाडय़ातही जोरदार पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्य़ातील बहुसंख्य तालुक्यांना पावसाने पुन्हा तडाखा दिला. अतिवृष्टीमुळे बहुतांश (पान ४ वर)

(पान ३ वरून) भागांत पिके भुईसपाट झाली. हिंगोलीबरोबरच लातूर, बीडमध्येही पावसाचा जोर होता. बीड जिल्ह्य़ात सलग तिसऱ्या दिवशीही संततधार सुरू असून अंबाजोगाई-परळी रस्ता बंद झाला होता. कपिलधारचा धबधबा पाहण्यासाठी गेलेले तिघे वाहून गेले.

उत्तर महाराष्ट्रातही संततधार सुरू असून, गेल्या आठवडय़ात पावसाने हाहाकार माजवलेल्या चाळीसगावला पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे चितेगाव आणि उंबर ओहळ धरणांतून मोठय़ा प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर आणि डोंगरी या नद्यांचे पाणी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. कन्नड घाटातील दरडी हटविण्याचे काम अजूनही सुरू असतानाच पुन्हा दरडी कोसळल्या आहेत. औरंगाबादकडे जाण्यासाठी या घाटाला पर्याय म्हणून वापर होणाऱ्या नागद घाटातही दरडी कोसळल्याने हा घाटही बंद झाला आहे.

आजही मुसळधारांचा इशारा

पुणे : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे बुधवारी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी (८ सप्टेंबर) पालघरमध्ये अतिवृष्टीचा लाल इशारा, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार येथे मुसळधार पावसाचा नारंगी इशारा देण्यात आला आहे. विघ्नहर्त्यां श्रीगणेशाचे आगमन शुक्रवारी होणार आहे. शुक्रवारनंतर राज्यातील पाऊसही ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त के ला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy rain disrupts life in several places in the maharashtra zws