संकटाआधीच्या संकेतांकडे दुर्लक्ष नको!

महाड तालुक्यातील तळीये येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळली.

|| हर्षद कशाळकर
भूवैज्ञानिक, अभ्यासकांचे आवाहन

अलिबाग : दरडी कोसळण्यापूर्वी संकेत मिळतात. हे संकेत लक्षात घेऊन स्थानिकांनी तातडीने आसपासचा परिसर सोडायला हवा, त्यांकडे दुर्लक्ष करू नये. अशा प्रकारची दक्षता घेतली तरच भूस्खलनाच्या घटनांमधील जीवितहानी रोखता येईल, असे मत भूवैज्ञानिक आणि दरड प्रवण क्षेत्राच्या अभ्यासकांनी व्यक्त केले. दरडी कोसळण्यास नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक कारणीभूत ठरतात, असेही त्यांनी सांगितले.

महाड तालुक्यातील तळीये येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळली. त्यात ८४ जणांचा मृत्यू झाला. गावातील काही नागरिकांना डोंगराची माती सैल होऊन खाली येत असल्याचे दुपारीच निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना तातडीने बाहेर पडण्याची सूचना केली होती. लोक गावाबाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच गावावर दुसऱ्या ठिकाणी भली मोठी दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली ३२ घरे गाडली गेली आणि ८४ जणांचा मृत्यू झाला.

महाड तालुक्यातील जुई गावावर २००५ मध्ये दरड कोसळली होती. गावातील गुराखी डोंगरावर गुरे चरायला गेले असताना त्यांना डोंगराला भेग पडल्याचे दिसले होते. संध्याकाळी परतत असताना ही भेग अधिकच मोठी झाल्याचे त्यांना आढळले. त्यांनी ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली होती. गावकऱ्यांनी सकाळी याबाबत निर्णय घेऊ असे ठरवले, परंतु त्याच रात्री गावावर दरड कोसळली आणि जवळपास अख्खे गाव दरडीखाली गाडले गेले. या दुर्घटनेतही ९०हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

दरडी एकदम कोसळत नाहीत. त्यापूर्वी संकेत मिळत असतात. हे संकेत स्थानिकांनी ओळखणे गरजेचे असते, त्याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते. नागरिकांनी वेळीच धोका ओळखून तो परिसर रिकामा करणे आवश्यक असते, असे मत भूवैज्ञानिक आणि दरडींचे अभ्यासक व्यक्त करतात.

दरडी का कोसळतात? 

कोकणात दरडी कोसळण्याची प्रामुख्याने चार कारणे आहेत. येथील प्रदेश हा प्रामुख्याने पर्वतमय आहे. या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. खडकांची रचना दरडीं कोसळण्यास कारणीभूत ठरते. या शिवाय हा परिसर भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे दरडींचा धोका जास्त संभावतो. कोकणातील बहुतांश रस्ते हे घाटमाथ्यावरून जातात. या रस्त्यांसाठी ठिकठिकाणी डोंगर पोखरले जातात. कालांतराने या परिसरात सैल झालेले डोंगर, दगडगोटे कोसळण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोकणात रस्ते आणि रेल्वेमार्गात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असते.

मानवनिर्मित कारणे

कोकणातील वाड्या-वस्त्या डोंगरमाथ्यावर, डोंगरकुशीत अथवा डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या असतात. या वस्त्यांचा विस्तार होतो, तेव्हा काही प्रमाणात उत्खनन अथवा सपाटीकरण केले जात असते. हे घटक त्यामुळे कालांतराने दरडी कोसळण्यासाठी कारणीभूत ठरतात. चर खणणे, वणवे लावणे, डोंगरमाथ्यावरील वृक्षतोड करणे हे घटकही दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरतात.

कमी वेळेत जास्त पाऊस धोकादायक

जेव्हा कमी वेळेत जास्त पाऊस पडतो तेव्हा दरडी कोसळतात. २१ आणि २२ जुलैला महाड आणि पोलादपूर परिसरात दोन दिवसांत ५०० ते ७०० मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे महाड पोलादपूर परिसरात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. २५ आणि २६ जुलै २००५ लाही महाड पोलादपूर परिसरात दोन दिवसांत ६०० ते ८०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जुई, दासगाव, रोहण, कोंडीवते गावांवर दरडी कोसळल्या होत्या.

दरडी कोसळणे, घरंगळणे, सरकणे यांसारख्या घटना वाढत आहेत. मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक यास काही प्रमाणात कारणीभूत आहे. क्रियेनंतर प्रतिक्रिया उमटतात. त्यामुळे झाडे कापली, वणवे लागले, चर खणले, तर दरडी कोसणारच. हे प्रकार थांबायला हवेत. आपले घर आणि गाव सोडण्याची लोकांची मानसिकता नसते, डोंगर उतारावर पुनर्वसनयोग्य जागा उपलब्ध नाहीत. एवढ्या गावांचे पुनर्वसन करणे अशक्य आहे. त्यामुळे पावसाळ्यात तात्पुरते स्थलांतरण करणे हा एकच उपाय आहे. अशा परिसरात शासनाने जबाबदारी उचलायला हवी. – सतीश ठिगळे, भूशास्त्रज्ञ, दरड अभ्यासक

महाड पोलादपूर येथे दरडग्रस्त गावांचे भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या अहवालानंतर दरडी कोसळण्यामागील नेमकी कारणे स्पष्ट होऊ शकतील. तोवर आम्ही खबरदारी म्हणून १६ गावे आणि वाड्यांमधील ४४० कुटुंबांतील १ हजार ६४० जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे. – निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rain fall flood dont ignore pre crisis signs geologists practitioner appeal akp

ताज्या बातम्या