सांगली : जिल्ह्यातील दहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, धुवाधार पावसाने तासगाव तालुक्यातील पेड या गावी ओढ्याचे पाणी शिरल्याने चार जनावरांचा गोठ्यातच तडफडून मृत्यू झाला, तर ढवळी येथे वैरण घेऊन घरी परतताना वीज कोसळून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. कुंडल येथे तीन तासांत ८८ मिमी पाऊस कोसळला आहे.गुरुवारी दुपारपासून विजेच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या विविध भागांत सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले, तर काही ठिकाणी ताली फुटल्याने शेतातील मातीही पिकासह खरडून गेली आहे.

मिरज तालुक्यातील ढवळी येथील सागर जिन्नाप्पा गुंडवाडे (वय ३७) या शेतातून वैरणीचा भारा घेऊन घरी परतणाऱ्या तरुणाचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. तर, पेड (ता. तासगाव) येथे कापूर ओढ्याला पूर आल्याने ओढ्याकाठी गोठ्यात बांधलेली चार जनावरे दावणीलाच तडफडून मरण पावली. तासगाव तालुक्यातील नरसिंगपूर, लिंबगाव, कापूरगाव, विजयनगर, घोटी परिसरात गुरुवारी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ढगफुटीसदृश पाऊस झाला. कापूर ओढा पात्राबाहेर वाहून गावात पाणी शिरले होते. पुलावरून पाणी वाहू लागल्याने रात्रभर गावाचा संपर्क तुटला होता. पुलावरून पाणी वाहत असल्याने तर तासगाव ते खानापूर रस्ता बंद झाला. आज सकाळपासून पाण्याला उतार आल्यानंतर वाहतूक सुरू झाली.

आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर दहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद कुंडल (ता. पलूस) येथे ८८ मिमी झाली. मिरज तालुक्यात बेडग येथे ६५.३, जत तालुक्यात उमदीमध्ये ७४.८, वाळवा तालुक्यात बहेमध्ये ६५.५, इस्लामपूर ८०.३, कामेरी ७१.५, शिराळा तालुक्यात शिरसीमध्ये ६५.५, आटपाडीमध्ये आणि पलूसमध्ये ६७ मिमी पाऊस नोंदला गेला.

जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस असा – मिरज -२२.८, जत -३५.७, खानापूर- १५.३, वाळवा- ५२.३, तासगाव -९.९, शिराळा- ४५.१, आटपाडी -३१.९, कवठेमहांकाळ -९.७, पलूस -५२.४ आणि कडेगाव -३७.३ मिमी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शुक्रवारी पहाटे हलका पाऊस झाल्यानंतर हवामान बदलले असून, आज दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली. हवेत उष्माही चांगलाच जाणवत होता. दिवसाचे कमाल तापमान ३२, तर किमान तपमान २३ अंश सेल्सिअस होते.