प्रचंड उष्म्यानंतर यंदाच्या हंगामातील रोहिणीच्या पावसाने सांगली जिल्ह्यातील बहुतांश परिसरात जोरदार वादळ, वा-यासह मंगळवारी दुपारी हजेरी लावल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. सांगली, मिरज शहरासह विटा, तासगांव, पलूस परिसरात जोरदार पाऊस झाला. ताकारी नजीक रेल्वे मार्गावर झाडे पडल्याने रेल्वे वाहतूकही दोन तास ठप्प झाली होती.
जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज दुपारी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. यंदाच्या हंगामातील रोहिणी नक्षत्राला दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २५ मे पासून सुरुवात झाली असून या नक्षत्राचा पाऊस शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीला उपयुक्त ठरणारा आहे. जत तालुक्यात उमदी, संख, तासगांव तालुक्यात सावळज, गव्हाण, कवठेमहांकाळ, नागज, कुची, खानापूर, विटा, पलूस आणि इस्लामपूर परिसरात जोरदार पाऊस झाला. दुपारनंतर सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची भुरभूर सुरू होती.
नागज, ढालगांव परिसरात विजेच्या गडगडाटात पाऊस झाला. ढालगांव येथील बिरोबा डोंगरावर जनावरे चारण्यासाठी गेलेले चार जण वीज कोसळल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. खानापूर, विटा परिसरात पावसामुळे माळावरील काही घरांचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. जोरदार वा-यामुळे झाडाखाली थांबलेल्या चारचाकी वाहनावर झाडाच्या फांद्या पडल्याचे प्रकार सांगली, मिरज परिसरात घडले.
ताकारी, किर्लोस्करवाडी दरम्यान असणा-या रेल्वे मार्गावर चार झाडे उन्मळून पडल्याने रेल्वे वाहतूक दोन तास रोखण्यात आली होती. यशवंतपूर-जोधपूर एक्स्प्रेस ताकारी स्थानकावर, तर निजामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेस किर्लोस्करवाडी स्थानकावर रोखण्यात आली होती. दोन तासाच्या प्रयत्नानंतर रेल्वे कर्मचा-यांनी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात यश मिळविले.