सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाने सलग दुसऱ्या दिवशी धुमाकूळ घातला. या मुळे शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले होते. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नगरपालिका प्रशासनाने गटार नाल्यांची स्वच्छता न केल्याने अनेक ठिकाणी घरे, दुकानात पावसाचे पाणी शिरले. यामुळे गोळीबार मैदान, गोडोली, गोडोली नाका साईबाबा मंदिर, ढोणे कॉलनी, माची पेठ परिसरात मोठे नुकसान झाले. शहरासह वेगवेगळ्या ठिकाणी वळवाच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला. जोरदार पावसाने सातारकरांची दैना उडाली.
शहराच्या अनेक भागांत पाणी साचणे, वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक कोंडी हे पावसाळ्यात दिसणारे नियमित चित्र यंदा पूर्वमौसमी पावसाने दाखवले. पुढील दोन-तीन दिवस दुपारनंतर ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरातील गोडोली, साईबाबा मंदिर परिसरात पाणी घरात आणि दुकानात घुसून लाखोंचे नुकसान झाले. पालवी चौकातील भैरवनाथ सोसायटीमध्ये काही घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडले. सदर बाजार येथील कुरेशी गल्लीमध्ये घरांमध्ये पाणी शिरून दलदल तयार झाली. भवानी पेठ येथे राजलक्ष्मी थिएटरच्या पिछाडीला एका ठिकाणी संरक्षण भिंत कोसळून नुकसान झाले.
सातारा पालिकेने आपत्कालीन परिस्थितीसाठी २५ कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले असून त्यांना युद्धपातळीवर कामे नेमून देण्यात आलेली आहेत. प्राधान्यक्रमाने साताऱ्यातील सात ओढ्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे ते पाणी हटवणे हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. विसावा नाका (बॉम्बे रेस्टॉरंट चौका) मध्ये रस्त्याचा समतोलपणा हरवल्याने पाणी साचून राहत आहे.
मंगळवारी रात्री वादळी वाऱ्याने कास यवतेश्वर रस्त्यावरील मोबाइल टॉवर कोसळला. या टॉवरखाली पाच गाड्यांचे मोठे नुकसान झाले. दोन जण जखमी झाले. मोबाइल टॉवर कोसळल्याने यवतेश्वर कास रस्ता तीन किलोमीटरपर्यंत ठप्प झाला. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. मुसळधार स्वरूपात पडणाऱ्या या पावसामुळे सातारकरांना अक्षरशः भयभीत करून सोडले. शहरात पोवई नाक्यावर पाणी साचले. त्यामुळे वाहनधारकांची त्रेधा उडाली. ग्रामीण भागात ओढ्यानाल्यांतून पाणी वाहिले. सखल भागात पाणी साचले. सायंकाळनंतर अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने सातारा शहर अंधारात होते. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ३३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा सदर बाजार येथे कारवर भिंत कोसळली.
बुधवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. माण तालुक्यामध्ये वीरकर वस्ती येथे झाड कोसळून गायीचा मृत्यू झाला. तर मार्डी येथे डाळिंब पिकाचे नुकसान झाले.वादळी वाऱ्याने आंबा पीक गळून पडले.
पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. महामार्गावर पाणी साचले. महाबळेश्वर पाचगणी येथे अचानक आलेल्या पावसाने पर्यटकांना आडोसा हुडकावा लागला. पावसात भिजण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. सायंकाळनंतर बाजारपेठ बंद झाली.