लोकसत्ता वार्ताहर
मनमाड: शहर आणि परिसरात सोमवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि वादळी वार्यासह सुमारे तासभर या पावसाने मनमाडकरांना चिंब केले. पावसाळापूर्व आलेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला. वातावरणात गारवा पसरला.
रब्बी हंगामातील पिकांची काढणीची कामे पूर्ण झाली आहेत. आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेती मशागतीच्या कामांनाही वेग येऊ लागला. यंदा रब्बी हंगामातील पिकांना अवकाळी पावसाने मोठा फटका बसला. चांगला भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले. आता खरीप हंगामात चांगला भाव मिळेल, या आशेवर बळीराजा मोठ्या जोमाने तयारीला लागला. पुढील महिन्यात सात जूनपासून पावसाळ्याला प्रारंभ होत आहे. सध्या मान्सूनपूर्व रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. कमालीच्या उकाड्याने नागरीक घामाघूम झाले आहेत. तापमान ३९ अंशांवर पोहचल्याने उन्हाचे तीव्र चटके बसत आहे. अशा परिस्थितीत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.
सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळांनी उकाडा प्रचंड वाढला होता. दुपारी तीनच्या सुमारास आभाळ भरून आले. सुरूवातीला पावसाच्या तुरळक सरी पडल्या. नंतर मेघगर्जना आणि वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. सखल भागात पाण्याचे तळे साचले. वादळी वार्याने सर्वांची तारांबळ उडून दिली. तब्बल तासभर जोरदार पाऊस झाला. वातावरणातील उष्मा काही अंशी कमी झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.