मराठवाडय़ातील ८५ मंडळांमध्ये अतिवृष्टी

औरंगाबाद : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मराठवाडय़ाच्या विविध भागात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडय़ातील ८५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.  हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी शिवारामध्ये ओढय़ाला आलेल्या पुराच्या पाण्यात एक सहा वर्षांची चिमुरडी वाहून गेली तर औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथेही एका शेतकरी वाहून गेला. या दोघांचेही मृतदेह रविवारी सकाळी हाती लागले. संध्या आकाश तागडे (वय ६), तर संजय धनवे अशी मृतांची नावे आहेत.

मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांमधील ८५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औरंगाबाद ११, जालना १६, बीड ३३, लातूर १०, उस्मानाबाद १२ व नांदेड, परभणी व हिंगोलीतील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टी झाली आहे. रात्रीच्या पावसात जालन्यातील पाचनवाडी येथे सर्वाधिक १८५ मिमीची नोंद झाली आहे. बीडमधील गेवराईतील १० मंडळ, उस्मानाबादमधील भूम-परंडा तालुक्यातील ९ मंडळ तर औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील ६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. ३० ऑगस्ट रोजी सर्वत्र झालेल्या पावसात बीड जिल्ह्य़ातील ३७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. हिंगोली जिल्ह्य़ात आतापर्यंत सरासरी ९६.३२ टक्के पाऊस झाला आहे. त्यात कळमनुरी तालुक्यात ८२६.६० मिमी पाऊस झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी येथे संध्या तागडे ही चिमुकली वाहून गेली. ती मूळची हादगाव तालुक्यातील करोडी येथील असून चिंचोर्डी येथे आजी-आजोबांकडे आली होती. त्यांच्यासोबतच शनिवारी ती शेतात गेली होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसामुळे संध्या तिच्या आजी-आजोबांसह गावात परतत होती. या वेळी चिंचोर्डी शिवारातील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून जात असताना आजोबांचा हात निसटून वाहून गेली. कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार शामराव गुहाडे, प्रशांत शिंदे, शशिकांत भिसे तसेच गावकरी भारत कुरुडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा शोध सुरू केला होता. दरम्यान, कळमनुरीचे तहसीलदार श्रीराम पाचपुते यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच कळमनुरी येथील समशेर पठाण यांना पुराच्या पाण्यात मुलीचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. परंतु रात्री उशीर झाल्यामुळे तिचा शोध लावण्यात अडथळे निर्माण झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पोलिस व गावकऱ्यांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर संध्याचा मृतदेह झुडपात अडकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव शिवारामध्ये नंदगाव भोसी नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेले शेतकरी संजय सीताराम धनवे यांचा मृतदेह रविवारी सकाळी सहा वाजता सापडला. संजय यांचे पाच एकर शेत आहे. शनिवारी सायंकाळी कुटुंबासह शेतातून घराकडे परतत होते. पावसामुळे भोसी नदीचे सुमारे ५०ते ६० फुटांचे पात्र ओलांडून जावे लागते. पाणी कमी म्हणून ते पात्र ओलांडून जात असताना अचानक आलेल्या प्रवाहात ते वाहून गेले. औंढानागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे जमादार दिघाडे, गोरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच गावकऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व गावकऱ्यांनी धनवे यांचा शोध सुरू केला होता. मृत धनवे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

लातूर जिल्ह्य़ातील १० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. शनिवारी सायंकाळी जिल्हाभरातील सर्व तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. रेणापूर व देवणी या दोन तालुक्यात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील ६० पैकी १० महसूल मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील पिकांना तर हा पाऊस लाभदायक आहेच, शिवाय जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास या पावसाने मदत होणार आहे. जिल्ह्यात जुलै व ऑगस्टच्या दरम्यान २० दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड होता. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. रविवापर्यंत आतापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या ११७.५ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ९२.५ टक्के पाऊस झाला आहे.

निम्न दुधना प्रकल्प तुडुंब

परभणी  : सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प ९८.८१ टक्के भरला असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  प्रकल्पाचे ५ , ६, १५ व १६ हे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. ३०२६८ क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज दिवसभर वातावरण ढगाळ होते, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याची नोंद आहे. शनिवारी सुद्धा दिवसभरात रिमझिम पाऊस झाला होता. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. सोमवार, मंगळवार, बुधवारी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, अशी माहिती परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के.के. डाखोरे यांनी दिली आहे.

बीड जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी

बीड : जिल्ह्य़ातील अकरापैकी सात तालुक्यातील ३३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून माजलगाव (७६.७३ टक्के) प्रकल्पात ४१ हजार २०० क्युसेसने पाण्याची आवक सुरू आहे. तर मांजरा धरणातील पाणीसाठा पन्नास टक्कय़ांवर गेला आहे. शिरूर कासार (१३७) तर गेवराई तालुक्यात (१२९.४) सर्वाधिक पाऊस झाला. सिंदफना, मणकर्णिका, कडी, अमृता या नद्यांना पूर आला आहे. सिंदफणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून परिसरातील पिकेही पूर्णपणे वाहून गेली आहेत. काही ठिकाणी गावांमध्ये पाणी शिरले आहे. राक्षसभुवन येथील शनि मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. आष्टी, पाटोदा वडवणी तालुक्यातील चौदा लघु तर परळी विभागातील ३२ प्रकल्प भरले आहेत. कडी नदीला अनेक वर्षांनंतर पूर आला आहे. पाटोद्याजवळील सौताडा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाले.

पन्नास टक्क्य़ांपेक्षा जास्त पाणीसाठा

उस्मानाबाद : शनिवारी दिवसभर व रात्री झालेल्या तालुक्यातील तेरणा व निम्नतेरणा प्रकल्पात ५० टक्कय़ांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तर परंडा तालुक्यातील चांदणी व खासापुरी, तुळजापूर तालुक्यातील बोरी नदी व परिसरातील प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागले आहेत. धरणातील पाणी प्रवाहात शेतकऱ्यांनी उडीद, मुगाच्या झाकून ठेवलेल्या गंजी वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात वार्षिक सरासरीच्या ९१ टक्के पावसाची नोंद प्रशासन दफतरी झाली.