अलिबाग : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सरासरी २५० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या २८ धरणांपैकी १३ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहे. एकूण संजय क्षमतेच्या ७४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला कोलाड येथील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ प्रकल्पात २३ टक्के पाणी साठा शिल्लक होता. यातील ९ धरणांमध्ये दहा टक्क्यांहून कमी पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचे ढग दाटले होते. जून महिन्याच्या वीस दिवसात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पाणी परिस्थिती बिकट झाली होती. हेही वाचा.Worli Hit and Run Case : मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत कोठडी; कोर्टात दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद मात्र गेल्या जून शेवटच्या दहा दिवसात मॉन्सुन पुन्हा एकदा चांगला सक्रिय झाला. जुलै महिन्यातही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. धरणांच्या क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. ५०.९८३ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे. सुतारवाडी, आंबेघर, कोडगाव, कवेळे, उन्हेरे, पाभरे, संदेरी, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले, मोरबे ही १३ धरणे पूर्ण संचयक्षमतेनी भरली आहेत. तर उसरण आणि फणसाड या दोन धरणांमध्ये ९० टक्केहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. हेही वाचा.“दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न”, खासदार अमोल कोल्हेंचा मोठा दावा श्रीगाव, अवसरे, रानिवली आणि सळोख या चार धरणांचा अपवाद सोडला तर इतर धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत अजून वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यातील २८ धरणात ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे. त्या तुलनेत सध्या धरणांमध्ये ५०.९८३ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे.