जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात एक खासगी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. हे हेलिकॉप्टर NMIMS चं असल्याची बाब देखील समोर येत आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरचे वैमानिक नसरूद अनिम (३०) यांचा मृत्यू झाला असून शिकाऊ महिला वैमानिक अंशिका गुजर (२१) गंभीर जखमी झाल्या आहेत. दुपारी ४ च्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केलं. अंशिका गुजर यांना दुर्घटनाग्रस्त विमानातून बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ही दुर्घटना घडल्यानंतर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी तपास पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे.

 

वर्डी येथील विश्रामपूरजवळजवळील धरणाच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल आहे. दुपारी चारच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने परिसरातील आदिवासी शेतकरी, शेतमजूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. छोटे हेलिकॉप्टर कोसळल्याचे पाहून त्यांनी तातडीने मदतकार्य सुरु केले. या अपघातात वैमानिक नसरूद अनिम यांचा जागीच मृत्यू झाला. शिकाऊ महिला वैमानिक अंशिका गुजरगंभीर जखमी असून चोपडा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिला मुंबईकडे रवाना करण्यात आले.

“अपघातग्रस्त विमान हे शिरपूर येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच वर्डी शिवारात कोसळले. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाला असण्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी शिकाऊ महिला वैमानिकास मुंबई येथे पाठविण्यात आले आहे”, अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी त्यावर शोक व्यक्त केला आहे. “एनएमआयएमएस अकॅडेमी ऑफ एविएशन यांच्या मालकीच्या प्रशिक्षण हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं वृत्त धक्कादायक आहे. यासंदर्भात तपास करण्यासाठी पथक तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. दुर्दैवाने या हेलिकॉप्टरमधील प्रशिक्षकाचा मृत्यू झाला असून ट्रेनी पायलट गंभीर जखमी झाली आहे”, असं ट्वीट ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलं आहे.