वाघिणीच्या हल्ल्यात मृत वनरक्षकाच्या परिवाराला ठाकरे सरकारची मोठी मदत; पतीला मिळणार नोकरी

त्यांच्या चार वर्षाच्या मुलीसाठी राज्य सरकार तथा विविध संस्थांच्या वतीने आर्थिक योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागात नोकरी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच श्रीमती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

स्वाती ढुमणे यांच्या पतीला तात्पुरती नोकरी देण्याचा निर्णय वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी जाहीर केला आहे. तसेच चार वर्षाच्या मुलीसाठी राज्य सरकार तथा विविध संस्थांच्या वतीने आर्थिक योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ताडोबा फाऊंडेशनकडून पाच लाखांचा धनादेश व ताडोबा संवर्धन प्रतिष्ठानकडून ५० हजारांची मदत देण्यात आली.

नक्की काय घडलं?

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना कार्यक्रमांतर्गत प्राण्यांच्या पाऊल खुणा नोंदविण्याच्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या दिवशीच महिला वनरक्षकावर वाघिणीने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना कोलारा येथील कोअर झोनच्या कक्ष क्रमांक ९७ मध्ये शनिवारी घडली. स्वाती एन. ढुमणे (४३) असे मृत महिला वनरक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे व्याघ्र प्रगणना कार्यक्रमाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

स्वाती ढुमणे यांनी कोलारा बीट येथे ३ सहायकांसह सकाळी ७ च्या सुमारास मांसभक्षी व मोठ्या तृणभक्षी प्राण्यांच्या पाऊलखुणांचे सर्वेक्षण सुरू केले होते. कोलारा गेटपासून कंपार्टमेंट क्रमांक ९७ पर्यंत सुमारे ४ कि.मी. पायी चालत गेल्यावर त्यांना सुमारे २०० मीटर अंतरावर एक वाघीण बसलेली दिसली. त्यांनी सुमारे अर्धा तास वाट पाहिली आणि घनदाट जंगलातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, याच दरम्यान वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Help for forest officer died in tiger attack in tadoba vsk

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या