लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कडवी लढत देणारे मनसेचे नेते हेमंत गोडसे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दडपशाहीवर आक्षेप घेत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीनंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आपणांस सहभागी करून घेतले नाही वा पक्षवाढीसाठी कोणतीही जबाबदारी सोपविली नाही. मनसेतील ही घुसमट असह्य़ झाल्यामुळे आपण या निर्णयाप्रत पोहोचल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत गोडसे यांनी थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल सव्वा दोन लाख मते मिळविली होती. अवघ्या १६ हजार मतांनी त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तत्पूर्वी, गोडसे यांची ओळख म्हणजे जिल्हा परिषदेचे मनसेचे जिल्ह्य़ातील पहिले सदस्य. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली असली तरी त्यांना कडवी टक्कर देणारे गोडसे हे सर्वाच्या लक्षात राहिले. या निवडणुकीनंतर पक्षाने जणू त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकला. सलग चार वर्षांत कोणतीही जबाबदारी आपल्यावर सोपविली गेली नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.