रत्नागिरी : कोकणातील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आता थेट अंतराळ संशोधनात झळकू लागली आहे. दापोली येथील सातवीत शिकणाऱ्या हेरंब मुकुंद लोंढे या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय मोहिमेत संभाव्य लघुग्रहाचा शोध नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.हेरंबने “आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहीम” (International Asteroid Search Campaign) या जागतिक मोहिमेत सहभाग घेतला होता.

या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांना शक्तिशाली दुर्बिणींनी टिपलेल्या अवकाशातील प्रतिमांचा बारकाईने अभ्यास करून त्यांचे विश्लेषण करावे लागते. या प्रतिमांचे परीक्षण करताना हेरंबच्या तीक्ष्ण निरीक्षणातून अवकाशात हालचाल करणारी एक वस्तू दिसून आली. ही वस्तू संभाव्य लघुग्रह असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून स्पष्ट झाले.

हेरंबने नोंदवलेल्या या निरीक्षणाला ‘ एल हेरंब पी १२ के एफ एच एस’ असा विशेष कोड देण्यात आला असून त्याला ‘प्रीलिमिनरी अॅस्टेरॉइड डिटेक्शन’ म्हणून मान्यता मिळाली आहे. या शोधाची पुढील वैज्ञानिक पडताळणी आता ” लघुग्रह माहिती केंद्र” (Minor Planet Center) मार्फत केली जात आहे. ही संस्था “आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ” ( International Astronomical Union ) अंतर्गत जगभरातील लघुग्रहांच्या शोधांची अधिकृत नोंद ठेवते.

हेरंब सध्या खेड येथील रोटरी इंग्लीश मिडीयम स्कूल खेड  येथे सातवीत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील डॉ. मुकुंद सुखदेव लोंढे हे पशुवैद्यकीय अधिकारी असून आई डॉ. रेणू मुकुंद लोंढे यादेखील पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. घरातून मिळालेले शैक्षणिक वातावरण आणि विज्ञानाविषयीची जिज्ञासा यामुळेच हेरंबने इतक्या लहान वयात ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.

आजच्या डिजिटल युगात अनेक मुले मोबाईल गेम्समध्ये रमलेली असताना हेरंबने मात्र अवकाशातील गूढ उलगडण्याची वाट निवडली आहे. त्याच्या या यशामुळे दापोलीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर झळकले आहे. पुढील वैज्ञानिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या संभाव्य लघुग्रहाच्या शोधाची अधिकृत नोंद हेरंबच्या नावावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.