यंदाच्या हंगामात सोयाबीन, तुरीला उच्चांकी भाव मिळत असून बाजारात आवकही प्रचंड वाढली आहे. बुधवारी सोयाबीन क्विंटलला ४ हजार ३८१ रुपये, तर तुरीला ४ हजार ७८६ रुपये इतका विक्रमी भाव मिळाला. मुगाचा भाव क्विंटलला ७ हजार ५०० रुपये झाला. हरभऱ्याचा भाव मात्र २ हजार ८०० रुपयांच्या आसपास आहे. गारपिटीमुळे हरभऱ्याची गुणवत्ता कमी असल्यामुळे भाव कमी आहेत.
या वर्षी सोयाबीनचे उत्पादन १५ टक्क्यांनी घटले. व्हिएतनाम, इराण, इराक या देशात सोयाबीन पेंडेची मागणी वाढली. अमेरिकेत पुरेसे उत्पादन झाले नाही. हवामान बदलामुळे ब्राझील, अर्जेटिना हे देशही अडचणीत आहेत. परिणामी सोयाबीनचा भाव चांगलाच वधारत आहे. येत्या आठवडय़ात सोयाबीनचा भाव क्विंटलला साडेचार हजार रुपयांवर जाईल व पुढील महिन्यात कदाचित ४ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठू शकेल, असे मत कीर्ती उद्योग समूहाचे अशोक भुतडा यांनी व्यक्त केले. बाजारात सोयाबीनची मोठी आवक होत आहे. आणखी थोडे दिवस शेतकऱ्यांनी कळ काढल्यास चांगला भाव मिळू शकेल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात या वर्षी सोयाबीनचा पेरा अधिक होता. मात्र, मुगाचा अत्यल्प पेरा झाल्यामुळे उत्पादन घटले. राजस्थानात खरीप हंगामात कमी पाऊस झाला. त्यामुळे तेथे मुगाचे उत्पादन नाही. काही ठिकाणी उन्हाळी हंगामात मूग घेतला जातो. गारपिटीमुळे त्यालाही फटका बसला. परिणामी आतापर्यंतच्या इतिहासात मुगाला सर्वाधिक भाव मिळत आहे. मुगाचा भाव ८ हजार रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या मूग डाळीला ११० ते १२५ रुपये प्रतिकिलो मोजावे लागत आहेत.