कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रविवारी दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. त्यानंतर विद्यापीठांच्या इतर परीक्षा रद्द झाल्या, अशाप्रकारचं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर उदय सामंत यांनी या परीक्षा रद्द होणार नसल्याची माहिती दिली.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसंच परीक्षांसंबंधी कुलगुरुंची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लवकरच अहवाल देईल. त्यानंतर त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असं सामंत यांनी स्पष्ट केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर जर आणीबाणीची परिस्थितीत निर्माण झाल्यास भविष्यात परीक्षा कशा घेव्या याबाबत निर्णय होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- Coronavirus outbreak : दहावीची भूगोल परीक्षा रद्द

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे इयत्ता १०वीची भूगोल आणि कार्यशिक्षण या विषयांची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच इयत्ता ९वी आणि ११वीच्या वार्षिक परीक्षाही रद्द करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी केली. त्यामुळे या तिन्ही वर्गात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा सुमारे १७ लाख विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थ्यांचा २३ मार्चला होणारा भूगोल तसेच कार्यशिक्षणचा पेपर करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. आता या विषयांच्या परीक्षा होणार नाहीत. त्यासह नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या आणि प्रात्याक्षिके आणि अंतर्गत मूल्यमापन करून या पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.