भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी, घटनेत बदल करणे गरजेचे असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी केले आहे. ते अलिबाग येथे आयोजित जाहिर सभेत बोलत होते.
देशाला स्वातंत्र मिळाले त्यावेळी भारतात ८६ टक्के लोक हिंदू होते. आज हे प्रमाण ७९ टक्क्यांवर आले आहे. स्वातंत्र्यानंतर देशातील हिंदूची संख्या मोठय़ा प्रमाणात घटत आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. ही परीस्थिती बदलायची असेल तर देशाला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करावे लागेल, त्यासाठी राजसत्ता मिळवावी लागेल, देशाच्या घटनेत त्यासाठी बदल करावा लागेल, कायदे बदलावे लागतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हिंदू समाज हा स्वकेंद्रीत झाला आहे. त्याला समाज केंद्रीत बनवावे लागेल, तरच ही परिस्थीती बदलेल अन्यथा एक वेळ अशी येईल हिंदूना आपल्याच देशात अल्पसंख्याक म्हणून राहण्याची वेळ येऊ शकेल, सुरक्षित हिंदू, समृद्ध हिंदू आणि सन्मानयुक्त हिंदू समाज हे विश्व हिंदू परिषदेचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. विश्व हिंदू परिषदेच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. बलशाली भारतासाठी संघटीत होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.