मानवतेला कलंक – अण्णा हजारे</strong>

पारनेर : हिंगणघाट येथील जळीतकांडास सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही जबाबदार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा  हजारे यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. राज्यात असे कृत्य घडते हा मानवतेला लागलेला कलंक असल्याचेही हजारे यांनी नमूद केले आहे.

आपल्या पत्रकात हजारे म्हणतात, हिंगणघाट येथील पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातून  संतापाची लाट उसळली आहे. सत्तेवर असणारे आणि विरोधात असणारे सर्वच वेगवेगळया प्रतिक्रिया देत असले तरी आण सर्वच याला जबाबदार आहोत. महाराष्ट्रात अनेक निर्भयांवर अन्याय अत्याचार होऊन त्यांची हत्या झाली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तरीही या नराधमांना फाशीची शिक्षा दिली जात नाही. याला कधीतरी जे सत्तेवर होते आणि आज सत्तेवर आहेत असे सर्व जण जबाबदार आहेत.

लोकसभा आणि विधानसभा ही कायदे करणारी सभागृहे आहेत. सर्वानीच मिळून अशा निर्भयांवर होणारे अन्याय अत्याचार होऊ नयेत यासाठी कायदा करणे आवश्यक होते. तसेच कठोर कायदे न झाल्यामुळे या नराधमांना असे कृत्य करण्याची भीती वाटत नाही. म्हणून अशा निष्पाप निर्भयांवर अत्याचार होतो, त्यांचा प्राण जातो. महाराष्ट्रात कोपर्डी, लोणीमावळा प्रकरण घडले. अशी कितीतरी प्रकरणे घडली, तरीसुद्धा कठोर कायदे झाले नाहीत. ही जबाबदारी विधानसभा आणि लोकसभेमध्ये जनतेने पाठविलेल्या लोकप्रतिनिधींची होती. पण ती जबाबदारी पार पाडली गेली नाही, हा दोष कोणाचा आहे असा सवाल हजारे यांनी केला आहे.

२०१२ मध्ये न्यायिक उत्तरदायित्व विधेयक संसदेत आल्यानंतर वेळोवेळी आपण सरकारशी पत्रव्यवहार करीत आहोत. हा कायदा व पोलिस  सुधारणा कायदा झाला असता, तर विलंब टळला असता असे त्यांनी म्हटले आहे.