प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे व सुविधांच्या बाबतीत रडतखडत कारभार असलेल्या परभणी विभागातील हिंगोली आगाराने पुरेशा गाडय़ा उपलब्ध नसतानाही १५ लाख ५० हजार रुपयांचा नफा मिळवला. इतर आगारांमध्ये पुरेशा गाडय़ा व सुविधा असूनही प्रत्यक्षात तोटय़ाचा कारभार व महामंडळही कोटय़वधींनी तोटय़ात असताना हिंगोली आगाराने ही कामगिरी केली.
परभणी विभागात परभणी, िहगोली, वसमत, कळमनुरी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी अशी ७ आगारे येतात. मात्र, िहगोली आगाराची अवस्था अत्यंत बिकट आहे. आगाराला संरक्षण िभत नसल्याने आगारातून हजारो रुपयांचे भंगार चोरीला जाते. बसस्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. आगारात नवीन गाडय़ांची वानवा असल्याने जुन्याच गाडय़ांवर कारभार चालतो. लांबच्या पल्ल्याच्या पूर्वीच्या अनेक गाडय़ा बंद झाल्या आहेत.
आगारात सध्या पुरेशा गाडय़ा नाहीत. आठ चालक व १३ वाहक कमी आहेत. उपलब्ध गाडय़ा खूपच जुनाट असून उद्दिष्टापेक्षा अधिक किलोमीटर धावलेल्या, तसेच त्यांची खिडक्या-दारेही व्यवस्थित नाहीत. विशेष म्हणजे िहगोली आगारातील लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा कळमनुरीतूनच सोडल्या जातात. िहगोली आगारातून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडण्याची मागणी असताना केवळ नवीन गाडय़ांअभावी लांब पल्ल्याच्या गाडय़ा आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात सोडल्या जातात. आगाराची अवस्थाही अत्यंत वाईट आहे. आगारात प्रामुख्याने जुनाट गाडय़ाच पाहावयास मिळतात. मात्र, गरसोय व असुविधांचा सुकाळ असतानाही िहगोली आगाराने १५ लाख ५० हजार रुपये नफा मिळविला. एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे मंगळवारी झालेल्या बठकीत हे चित्र समोर आले. िहगोली आगाराने एप्रिल, मे व जून महिन्यात हा नफा कमावला, असे आगारप्रमुख एस. टी. सोनवणे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी याच तिमाहीत हे आगार ८ लाखांनी तोटय़ात होते. या वेळी मात्र नियोजनपूर्वक काम केल्याने नफ्यात आले. परभणी आगार २ लाख ५०, जिंतूर आगार ७ लाख ५० हजार रुपयांनी नफ्यात, तर पाथरी ४० लाख, गंगाखेड ३० लाख, वसमत २५ लाख व कळमनुरी आगार २१ लाखांनी तोटय़ात असल्याचे बठकीत सांगण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष गोरे यांनी या बठकीत मार्गदर्शन करताना तोटय़ातील आगार नफ्यात कसे आणता येईल, याचा आराखडा तयार करून त्यानुसार काम करण्याच्या सूचना दिल्या.