कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘तारा’, ‘चंदा’ नंतर आता हिरकणी वाघिणीची डरकाळी घुमणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यात आज शनिवारी (दि. ७) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून आणलेल्या एसटीआर ०६ या वाघीणीस निसर्गात सुरक्षितस्थळी मुक्तसंचारास सोडण्यात आले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ही तिसरी वाघिण असून, तिला ‘हिरकणी’ हे नवे नाव देण्यात आले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून परवा गुरुवारी ५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता या वाघिणीला पकडण्यात आले. त्यानंतर तिला सुरुवातीला वाहनाने आणि नंतर बोटीने प्रवास करून, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काल शुक्रवारी रात्री आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर या वाघिणीला मांस खाण्यासाठी घालण्यात आले, आणि आज शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास कोयना अभयारण्यातील मध्यवर्ती सुरक्षित जंगल क्षेत्रात या वाघिणीचा ऐतिहासिक मुक्तसंचार सुरु झाला.

कोयना अभयारण्यात या आधीचा एसटीआर ०३ हा बाजी नर वाघ तसेच तारा व चंदा या वाघिणी दाखल आहेत. आता त्यांच्या जोडीला नवीन आणलेली ही एसटीआर ०६ वाघीण कोयना वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रजननवृद्धीसाठी सोडण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने व अनेक दुर्मिळ प्रजातीने समृद्ध असा हा ११६५ चौरस किलोमीटरचा परिसर सातारा, सांगली, कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यात पसरलेला शासनाचा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे (फिरते पथक), अक्षय साळुंखे (कोयना), विजय बाटे (बामणोली), तुषार जानकर (पाटण), अक्षय करमळकर (कांदाट), मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे व वनपाल, वनरक्षक यांच्या सहभागातून एसटीआर ०६ या वाघीणीचे पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यवर्ती सुरक्षित जंगलात यशस्वी स्थलांतर पार पाडले आहे.

‘हिरकणी’ नवे नाव

पेंच व्याघ्र प्रकल्पात या वाघिणीला ‘पीटीआर १२३’ हा क्रमांक होता. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ती आल्यावर तिला ‘एसटीआर ०६’ हा शासकीय क्रमांक देण्यात आला आहे. तर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग मार्गदर्शक (गाईड) मंडळींनी या नव्याने दाखल झालेल्या वाघिणीला ‘हिरकणी’ हे नाव दिले आहे.