शिवआख्यान शांतावले.. ; शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश

बाबासाहेबांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणारे तपस्वी, प्रखर बुद्धिमत्ता, सूक्ष्म विश्लेषण क्षमता आणि इतिहास लेखनाची विलक्षण प्रतिभा लाभलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. अमोघ आणि ओजस्वी वाणीने शिवरायांचा इतिहास जिवंत करणाऱ्या बाबासाहेबांच्या निधनामुळे शिवआख्यान शांतावले.

दादरा- नगर हवेली मुक्ती संग्रामातील सेनानी, ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक आणि जगाला हेवा वाटेल अशा ‘शिवसृष्टी’चे संकल्पक अशी ओळख असलेल्या बाबासाहेबांनी वयाच्या १६व्या वर्षांपासून शिवछत्रपतींचा पराक्रम, महाराष्ट्राचा इतिहास आणि येथील उत्तुंग सांस्कृतिक परंपरेवर संशोधनास प्रारंभ केला. त्यांच्या या ७५ वर्षांच्या ध्यासपर्वातून अनेकोत्तम ग्रंथसंपदा साकार झाली. ती घराघरात विराजमान झाली. त्यांच्या या कार्यातून अनेकांनी प्रेरणा घेतली.   

 जन्मतारखेनुसार २९ जुलै रोजी आणि तिथीनुसार नागपंचमीला (१३ ऑगस्ट) बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी कोथरूड येथील घरात पाय घसरून पडल्याने पुरंदरे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करीत होते. मात्र, वयोमान आणि न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

बाबासाहेबांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. बाबासाहेबांना त्यांच्या हजारो चाहत्यांनी आणि अनुयायांनी जड अंत:करणाने निरोप दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. बाबासाहेबांच्या पश्चात कन्या, प्रसिद्ध लेखिका-गायिका माधुरी पुरंदरे, पुरंदरे प्रकाशनचे संचालक अमृत पुरंदरे आणि ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’चे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे हे पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

बाबासाहेबांनी २९ जुलैला वयाच्या शंभरीत प्रवेश केला होता. नऱ्हे आंबेगाव येथील शिवसृष्टी येथे ज्येष्ठ गायिका आशा भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे नेते आशीष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा झाला होता. करोना संक्रमणाच्या काळात त्यांच्या प्रकृतीला विश्रांती मिळावी, यासाठी त्यांचे वास्तव्य त्यांचे पुत्र अमृत पुरंदरे यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी होते. रुग्णालयात दाखल होईपर्यंत ते सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय होते.

बाबासाहेबांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी महिलांसह तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी पुरंदरे वाडा आणि नंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे गर्दी केली होती. सामान्यांशी नाळ जोडली गेलेल्या बाबासाहेबांना निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

बाबासाहेबांच्या निधनाचे वृत्त समजताच सकाळपासूनच पुणेकरांची पावले पर्वती येथील त्यांच्या घराकडे वळू लागली. त्यांच्या निवासस्थानी सकाळी साडेआठ ते साडेअकरा या वेळेत बाबासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सर्वसामान्यांसह राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, आमदार मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेता सौरभ गोखले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, पं. वसंतराव गाडगीळ, सरसेनापती सरदार दाभाडे घराण्याचे वंशज सत्यशील दाभाडे, राहुल सोलापूरकर, शाहीर हेमंत मावळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामातील त्यांचे सहकारी वसंत प्रसादे, निवेदक सुधीर गाडगीळ, गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

शिवचरित्राचा तपस्वी

शिवचरित्र घरोघरी पोहोचावे या ध्येयाने झपाटून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमांतून ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या पाच लाखांहून अधिक प्रती घराघरामध्ये पोहोचल्या आहेत. अमोघ वक्तृत्व लाभलेल्या बाबासाहेबांनी महाराजांवर १५ हजारांहून अधिक व्याख्याने दिली. बाबासाहेब आणि ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा, मराठा साम्राज्याचा आणि शिवकालीन दस्तावेजांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. तो सर्वांपर्यंत पोहोचवला.  

जाणता राजामहानाटय़ाचे निर्माते 

छत्रपतींचा इतिहास सांगण्यासाठी बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ हे महानाटक लिहिले. त्याचा पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. गेल्या ३६ वर्षांत महाकाय रंगमंचावर त्याचे १२५० हून अधिक प्रयोग झाले. या नाटकाच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची देणगी दिली. हे नाटक हिंदूी-इंग्रजीसह पाच अन्य भाषांत भाषांतरित केले गेले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे झालेले दु:ख शब्दांतित आहे. इतिहास आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुरंदरे यांच्या कार्यामुळे येणाऱ्या पिढय़ा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडल्या जातील. त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शिवभक्त बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त ऐकू न मला धक्का बसला. शिवछत्रपतींचे अलौकिक कार्य शिवचरित्राद्वारे बाबासाहेबांनी घरोघरी पोहोचवले. त्यांचे सर्व जीवनच छत्रपतीमय होते. छत्रपतींमुळेच महाराष्ट्र घडला, याची जाणीव त्यांनी आजच्या पिढीला करून दिली. आम्हा सर्व मंगेशकरांचे बाबासाहेबांबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अगदी अलीकडेच माझे आणि त्यांचे बोलणे झाले होते. तेव्हा त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले होते. या पितृतुल्य व्यक्तित्वाला माझा त्रिवार मुजरा आणि विनम्र श्रद्धांजली.    

– लता मंगेशकर

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखा शिवचिंतनात रमलेला शिवआराधक पृथ्वीच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्रोत राहिला आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्राला एका व्रतस्थ, ऋषितुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील.    

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Historian babasaheb purandare passes away in pune zws

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या