आंतरजातीय विवाह अनुदान योजनेला फटका; निधीच नसल्याने रायगडमध्ये २३५ जोडपी लाभापासून वंचित

शासनाकडून सुमारे १ कोटी १७ लाख रुपयांचा निधी येणे बाकी आहे. निधीअभावी २३५ जोडपी योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत.

marriage-vastu-tips

निधीच नसल्याने रायगडमध्ये २३५ जोडपी लाभापासून वंचित

अलिबाग : केंद्र आणि राज्याकडून निधी मिळत नसल्याने, गेल्या दोन वर्षांपासून आंतरजातीय विवाह अनुदान योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. रायगड जिल्ह्यात २३५ जोडपी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत.

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. समाजातील जातीपातीच्या भिंती तुटून पडाव्यात हा यामागचा मूळ उद्देश असतो. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना हे अनुदान वितरित केले जात असते. मात्र मागील दोन वर्षांपासून या योजनेचा जिल्ह्यात निधीअभावी बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज करूनदेखील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

शासनाकडून सुमारे १ कोटी १७ लाख रुपयांचा निधी येणे बाकी आहे. निधीअभावी २३५ जोडपी योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत. सुरुवातीला आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना १५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जात होते. त्यात नंतर वाढ करण्यात आली. आता आंतरजातीय विवाहांसाठी प्रत्येक जोडप्याला ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. त्यामुळे या योजनेला असलेला प्रतिसादही वाढीस लागला आहे. दरवर्षी शंभरहून अधिक अर्ज जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दाखल होत आहेत.

ज्या वेळी शासनाकडून निधी प्राप्त झाला त्या वेळी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे. सध्या २३५ लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. शासनाकडून निधी मिळाल्यास तातडीने त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.  – गजानन लेंडी, समाजकल्याण अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hit the interracial marriage grant scheme akp

Next Story
शिवसेना काँग्रेसमध्ये गेलीच आहे त्यामुळे आता ‘यूपीए’त गेली तर काय विशेष? – दरेकर
फोटो गॅलरी