अहिल्यानगर: राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर उभ्या राहिलेल्या हिवरेबाजारच्या (ता. अहिल्यानगर) आदर्श ग्रामविकास ‘मॉडेल’ची दखल आता देशाच्या राजधानीतही घेण्यात आली आहे. या गावाची यशोगाथा दिल्लीतील ऐतिहासिक कुतुबमिनारवर, पर्यटकांसमोर झळकवली जाऊ लागली आहे.
दिल्लीतील कुतुबमिनारवर सादर करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेझर शोमध्ये भारतातील समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे ‘चेंज मेकर्स’ तसेच प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखविली जाते. या चित्रफितीत हिवरेबाजार गावाचा समावेश करण्यात आला आहे. ही घटना जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
देश-विदेशातून दररोज हजारो पर्यटक कुतुबमिनारला भेट देतात. या पर्यटकांना भारतातील प्रेरणादायी विकासकथा आणि सामाजिक परिवर्तनाची उदाहरणे लेझर शोच्या माध्यमातून अनुभवता येतात. त्यामध्ये हिवरेबाजारने जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, लोकसहभाग आणि शाश्वत ग्रामविकासाच्या माध्यमातून घडवून आणलेला परिवर्तनाचा प्रवास प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे.
चित्रफितीत आदर्शगाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध उपक्रमांची, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन, भूजल पुनर्भरण, वृक्षसंवर्धन, दुष्काळावर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवत गावाचा सर्वांगीण विकास साधल्याची माहिती देण्यात आली आहे. एकेकाळी दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि स्थलांतर यांसारख्या गंभीर समस्यांनी ग्रासलेले हिवरेबाजार आज देशातील आदर्शगाव म्हणून ओळखले जाते.
हिवरे बाजारच्या या उल्लेखामुळे केवळ गावाचाच नव्हे, तर अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याचा नावलौकिक देशभर पोहोचला आहे. ग्रामीण विकास, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणाऱ्या हिवरेबाजारच्या कार्याला मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील आणखी एक मोठी दाद मानली जात आहे. हिवरेबाजारचे ग्रामसमृद्धीचे मॉडेल राज्यातील आदर्शगाव योजना, जलसंधारणासाठी सुरू केलेली जनजागृती यासाठी पोपटराव पवार यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
दिल्लीतील कुतुबमिनार येथे दररोज सादर होणाऱ्या लेझर शो देश-विदेशातील हजारो पर्यटक पाहतात. या चित्रफितीत हिवरे बाजारच्या जलसंधारण, पाणी नियोजन, लोकसहभाग आणि शाश्वत ग्रामविकासाच्या कार्याचा समावेश झाल्याने गावाच्या विकास मॉडेलला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे.
दुष्काळग्रस्त गाव ते आदर्श गाव अशी वाटचाल करत पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारण, वृक्षसंवर्धन, पाणी नियोजन, श्रमदान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावाने विकासाची नवी दिशा निर्माण केली. आज हिवरे बाजारचे विकास मॉडेल देशातील अनेक राज्यांसाठी अभ्यासाचा आणि प्रेरणेचा विषय बनले आहे.
