केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर व अर्थ, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा स्थानिक प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात चंद्रपूर संघर्ष बचाव समितीच्या नेतृत्वाखाली १८६ संघटनांनी सत्कार केला. यावेळी सत्कारमूर्तीनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासाचे आश्वासन उपस्थित संस्था, संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांना दिले.
चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील विविध संघटनांकडून आयोजित या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी होते. यावेळी मंचावर आमदार नाना शामकुळे, आमदार अनिल सोले, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंदडा, सचिव मधुसुदन रुंगठा उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात गिरीश गांधी यांनी अहीर व मुनगंटीवार यांचे कौतुक करत जिल्ह्यातील संस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची स्तुती केली.
देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा अहीर यांनी उघडकीस आणला तर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षात राहून विधानसभा गाजवली आहे. या दोन्ही नेत्यांचा चंद्रपूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालाही अभिमान आहे. त्यामुळे चंद्रपूरसोबतच महाराष्ट्राचाही विकास या दोन्ही नेत्यांच्या हातून घडेल. मात्र, ही जबाबदारी या नेत्यांसह जनतेचीही असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना हंसराज अहीर यांनी जनतेच्या आशीर्वादाननेच आपण मंत्रिपदापर्यंतची मजल गाठली आहे. आपल्याला मोठे करण्यात जनतेचे मोठे योगदान असल्याचे सांगत देशातील रसायन व खताचे ४६ टक्के उद्योग बंद पडले आहे. त्यामुळे ८ लाख कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. या कामगारांना काम देण्यासह देशातील सर्व जिल्ह्यात खताचे कारखाने उभे होऊन लाखो बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी एलबीटी रद्द करण्याचा विश्वास जनतेला दिला. आज आपण मंत्री असलो तरी उद्या राहणार नाही. याचे आपल्याला भान असून चंद्रपुरात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचे सांगितले. येत्या २९ नोव्हेंबरला एक पथक चंद्रपुरात येणार असून चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्रही उभे राहणार आहे. आमच्या समोर काटे ठेवले आहेत. हे काटे पार करताना अनेक अडचणी येणार असल्या तरी जनतेच्या भावना समजून अनेक विकास कामे केली जाणार असल्याचे अभिवचनही त्यांनी दिले. याप्रसंगी अहीर व मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. आमदार नाना शामकुळे, आमदार अनिल सोले यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड.मल्लक शाकीर व किरण बुटले यांनी केले.