त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. मात्र, या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये भाजपने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला होता. या संपूर्ण प्रकाराबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्रिपुरा येथील घटनांच्या निषेधार्थ काही मुस्लीम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी काही समाजकंटकांनी दुकानांवर दगडफेक केली. तसेच काहींना मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ भाजपाने ‘अमरावती बंद’चे आवाहन केले होते. शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर भागांतून बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राजकमल चौकात जमले होते. तेथे कार्यकत्र्यांनी प्रचंड घोषणाबाजी काली. काही वेळानंतर भाजपाचे आंदोलक कार्यकर्ते ऑटोगल्ली, अंबापेठ परिसरांत शिरले. घोषणाबाजी करीत त्यांनी बंद दुकानांवर दगडफेक केली. अंबापेठ येथील एका रुग्णालयावरही दगडफेक करण्यात आली. आंदोलक नमुना गल्ली परिसरात शिरल्यानंतर त्यांना दुसऱ्या गटाकडून प्रतिकार करण्यात आला. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी या परिसरात काही दुकाने, टपऱ्या पेटवून दिल्या. वाहनांना आग लावली.

याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखमीमध्ये भाष्य केले आहे. “याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल असे वाटले नव्हते. बांग्लादेशमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्रिपुरामध्ये आंदोलने केली. तिथे घटलेल्या घटनांवरुन आणि घोषणांवरुन निषेध करण्यासाठी एका संघटनेने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्यामधून दगडफेक आणि इतर घटना झाल्या. ते शांत झाल्याच्या नंतर एका राजकीय पक्षाच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती आणि तिथे सुद्धा तसाच प्रकार घडला. ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी आहे. पण अशा घटना घडत आहेत की घडवल्या जात आहेत यासंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर कारवाई केली जाईल,” असे वळसे पाटील म्हणाले.

“रझा अकादमीचा संदर्भात मी पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये जर त्यांची भूमिका दिसली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. तसेच यामध्ये कुठला राजकीय पक्ष आणि कुठला नेता आहे हे जास्त महत्त्वाचे नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.