गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना करोनाचा संसर्ग; वर्षभरात दुसऱ्यांदा करोना पॉझिटिव्ह

दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे

Home Minister Dilip Walse Patil, दिलीप वळसे पाटील, करोना, कोव्हिड, कोविड
दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे

देशात आणि राज्यात सध्या करोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. मात्र अद्यापही करोना पूर्णपणे आटोक्यात आला नसल्याने चिंता कायम आहे. रुग्णसंख्येत अचानक होणारी वाढ आणि घट पहायला मिळत असल्याने आणि दुसऱा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. याआधीही दिलीप वळसे पाटील यांना करोना झाला होता. वर्षभरात दुसऱ्यांदा त्यांना करोनाची लागण झाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “करोनासदृश्य लक्षणं दिसत असल्याने मी माझी चाचणी केली असून करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे”.

“नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसंच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझं आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास करोना चाचणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं व करोना नियमांचं काटेकोर पालन करावं,” असं दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

याआधी गतवर्षी २९ ऑक्टोबरला दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण झाली होती. दैनंदिन कामकाजासाठी सकाळी ते मंत्रालयात उपस्थित होते. अहवाल येताच ते घरी परतले होते. त्यावेळीही त्यांनी ट्वीट करत माहिती दिली होती.

राज्यातील लसीकरणाचा वेग घसरला

दिवाळीच्या तोंडावर राज्यात जागोजागी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून करोनाच्या नियमांचे पालनही नागरिकांकडून होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर पहिली लस मात्रा घेतलेल्या सुमारे ७५ लाख लोकांनी मुदत उलटूनही दुसरी लस मात्रा घेतलेली नाही. यातील गंभीर बाब म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाचा वेगही घसरला आहे. महाराष्ट्रात आजघडीला ९ कोटी ६२ लाख ८३ हजार ५५१ लोकांचे लसीकरण झाले असले तरी गेल्या महिन्याच्या तुलनेत दैनंदिन लसीकरणाचा वेग मंदावला आहे. गेल्या महिन्यात साधारणपणे आठ लाख ते दहा लाख दररोजचे लसीकरण होत होते. परिणामी सप्टेंबर महिन्यात राज्यात २ कोटी २८ लाख लोकांनी लस मात्रा घेतल्या होत्या तर ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत केवळ दीड कोटी नागरिकांनीच लस मात्रा घेतल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Home minister dilip walse patil tests covid positive sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या