मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्यातर मानव जात जास्तीत – जास्त चार वर्षे जगू शकेल, असे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात आज मधमाशा अस्तित्वात असतानाही नजीकच्या भविष्यातच उपासमारीचे संकट घोंगावत आहे. मानवाने केलेला पर्यावरणाचा ऱ्हासच मानव जातीच्या मुळावर उठला आहे.  

मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मानव जात जास्तीत जास्त चार वर्षे जगू शकेल, असे थोर शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात मधमाशा अस्तित्वात असूनही, सुद्धा मानवाची अन्नसुरक्षा अडचणीत आली आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र फळ पिकांत आघाडीवरील राज्य आहे. डाळिंब, बोर, द्राक्ष, आंबा, संत्रा, मोसंबी सारख्या फळपिकांत समृद्ध आहे.

यंदा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मधमाशांची प्रतीक्षा करावी लागली. सध्याच्या आंबिया बहरात ही समस्या आणखी उग्र झाली आहे. डाळिंबाचे परागीभवन होण्यासाठी मधमाशांची नितांत गरज असते. मधमाशांकडून परागीभवन न झाल्यास डाळिंबाची शेती अडचणीत येते. त्यासाठी डाळिंब उत्पादकांनी मधपेट्या भाड्याने आणून आपल्या डाळिंबाच्या बागेत ठेवल्या होत्या. तरीही अनेक ठिकाणी अपेक्षित प्रमाणावर परागीभवन झाले नाही. सद्या डाळिंबांसह शेवगा शेतात ही समस्या अधिक गंभीरपणे समोर आली आहे. सध्या शेवग्याचे दर ४०,००० प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. हा शेवग्याच्या महागाईच्या उच्चांक आहे. या शेवग्याचे परागीभवन होण्यासाठी मधमाशांची गरज असते. पण, मधमाशांच्या अभावी परागीभवनावर परिणाम होताना दिसत आहे. वेलवर्गीय म्हणजे काकडी, टरबूज, कलिंगडाच्या  परागीभवनाची ही अशी स्थिती आहे.

शेतकरी मधपेट्या भाड्याने आणून नैसर्गिक, कृत्रिमरित्या परागीभवनाचा वापर करीत आहे. तरीही अपेक्षित यश मिळत नाही. काही शेतकरी गूळ, वेलायची आणि ताकाची फवारणी करणे. शेतात विविध ठिकाणी गूळ आणि वेलायची उकळून त्याच्या धुराचा वापर करून किंवा तिच्या गंधाचा वापर करून मधमाशांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही मधमाशा आकर्षित होताना दिसत नाहीत.

मधमाशा असे काम करतात

मधमाशा ताशी ५० किलोमीटर वेगाने प्रवास करतात. मिनिटात २० ते २५, तर तासाभरात १२०० ते १५०० फुले, रोपट्यावर बसून, मध गोळा करतात. सूर्याेदयाच्या तासभर आधीपासून सूर्यास्तानंतरही बराच वेळ तिचे काम सुरू असते. त्यामुळे परागीभवनाची प्रक्रिया झपाट्याने होते. या प्रक्रियेमुळे शुद्ध आणि उत्पादक बियाण्यांची निर्मिती होते. त्यामुळे उत्पादन वाढते.

परागीभवनाची प्रक्रिया नेमकी कशी असते

स्व – परागीभवन (Self-pollination) आणि पर – परागीभवन (Cross-pollination), जे परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलात कसे हस्तांतरित होतात यावर अवलंबून असतात. तसेच, हे हस्तांतरण जैविक (कीटक, पक्षी, प्राणी) किंवा अजैविक (वारा, पाणी) घटकांमार्फत होऊ शकते. स्व-परागीभवनात परागकण त्याच फुलात किंवा त्याच झाडावरील दुसऱ्या फुलात पडतात, तर पर-परागीभवनात ते दुसऱ्या झाडावरील फुलावर पडतात, ज्यामुळे नवीन प्रजाती तयार होण्यास मदत होते.

मधमाशी संपल्यास होणारे परिणाम

मधमाश्या वनस्पतींमधील परागीभवनासाठी (pollination) अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या नसल्यास, वनस्पती बीज तयार करू शकणार नाहीत आणि त्यांची प्रजनन प्रक्रिया थांबेल. अनेक फळे, भाज्या आणि बियांचे उत्पादन मधमाश्यांच्या परागीभवनावर अवलंबून असते. त्यांच्या अभावामुळे अन्नधान्य आणि पौष्टिक पदार्थांची तीव्र टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. मधमाश्यांच्या मदतीने शेतीत उत्पादनात मोठी वाढ होते, पण, मधमाश्या संपल्यास शेतीमालाचे उत्पादन घटेल. मधमाश्या अनेक वनस्पती आणि जंगली फुलांच्या परागीभवनासाठी आवश्यक आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे जैवविविधतेवर (biodiversity) गंभीर नकारात्मक परिणाम होईल.

dattatray.jadhav@expressindia.com