अश्वांमधील संवेदनशीलतेचा सांगलीमध्ये काळजाला चटका लावणारा अनुभव

माणसांमधील ‘माणुसकी’चा झरा आटत असल्याची उदाहरणे पदोपदी दिसतात. मात्र सांगली-मिरज रस्त्यावर एका घोडय़ाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या सहचरांनी व्यक्त केलेला शोक प्राणीमात्रांमधील प्रेमाचा मूक धागा उलगडून दाखवणारा ठरला. येथील एका वर्दळीच्या रस्त्यावर गुरुवारी अपघात घडला. एका दुचाकीस्वाराने एका अश्वाला धडक दिली. अपघातात घोडा जागीच ठार झाला. बघ्यांची गर्दी झाली, पण या गर्दीत आजूबाजूला असणारे अश्वही सामील होऊन अश्रू ढाळू लागले. मन हेलावून टाकणारे हे चित्र पाहताना त्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळय़ांच्या कडाही नकळतपणे ओलावल्या.
अमोल मलगोंडा बळनेंदा हे दुचाकीवरून सांगलीहून मिरजेकडे निघाले होते. या वेळी रस्त्यावर आलेल्या घोडय़ास त्यांच्या दुचाकीची जोरात धडक बसली. यामध्ये हा घोडा जागीच मृत्युमुखी पडला, तर अमोलही जखमी झाले. अपघातानंतर गर्दी झाली. पोलीस आणि पालिकेचे लोकही आले. अमोल यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र घोडय़ाचा मालक सापडत नसल्याने त्याच्याबाबतचा निर्णय लवकर होत नव्हता.
दरम्यान, तोवर या गर्दीत अचानक चार घोडेही सामील झाले आणि आपल्या या मित्रासाठी अश्रू ढाळू लागले. त्यांची ही कृती पाहून उपस्थित लोक थोडे मागे सरकले. प्राण्यांमधील ही संवेदनशीलता पाहून बघ्यांच्या डोळय़ांच्या कडा नकळतपणे ओलावल्या. संध्याकाळी पालिकेच्या वतीने या मृत घोडय़ाला शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. त्याचे हे चार अश्वमित्र शेवटपर्यंत त्याच्या मृत शरीरासोबत बसून होते.