कराड : फलटणसाठी खासदार फंडातून तीन डायलिसिस मशीन व दोन सोनोग्राफी मशिन्स देणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली. आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत फलटण उपजिल्हा रुग्णालयात सर्वरोग निदान शिबिराच्या  उद्घाटनप्रसंगी रणजितसिंह बोलत होते. जिल्हा परिषदेच्या सदस्या अ‍ॅड. जिजामाला निंबाळकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

खासदार निंबाळकर म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन भरघोस निधी देऊन आरोग्य विषयक विविध योजना राबवत आहे. त्याचाच एक भाग केंद्र शासनाच्या आजादी का अमृतमहोत्सवी कार्यक्रमांतर्गत फलटण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या पैकी आयुष्मान भारत योजना व इतर आरोग्याविषयी कार्यक्रम लवकरच फलटण भाजपच्या वतीने फलटण तालुक्यासह शहरात राबवणार असून, गोरगरीब जनतेला याचा लाभ मिळवून देणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त केंद्र सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित करोना महामारीच्या काळात ज्या डॉक्टर, नर्स, सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिलेली आरोग्यसेवा ही उल्लेखनीय असून, इतरांना प्रेरणादायी आहे. या आरोग्य सेवकांकडून इथून पुढेही गोरगरीब व गरजू लोकांना उत्तम आरोग्यसेवा मिळत राहो. गोरगरीब रुग्णांनी याचा लाभ घेऊन निरोगी आरोग्य जपावे व हसतखेळत जगावे. तसेच भारत सरकारच्या जनरीक औषधाचे महत्त्व  पटवून देणार आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य धोरणाच्या बाबतीत कायम कटिबद्ध राहून केंद्र शासनाने दिलेल्या आरोग्य विषयांचे कार्यक्रम राबवणार असल्याचे रणजितसिंह यांनी सांगितले.