मुख्यमंत्र्यांबाबतच्या विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद

रत्नागिरी / अलिबाग / मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले.

नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची कोकण विभागीय जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास चिपळूणहून संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे पोहोचली. तेथील गोळवलकर गुरुजी स्मारकामध्ये कार्यक्रम आटोपून अल्पोपहार सुरू असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आपल्या ताफ्यासह तिथे दाखल झाले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अटक होऊ  नये, अशी मागणी करणारा राणे यांचा अर्ज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जनआशीर्वाद यात्रेत स्वत: राणेंसह त्यांचे चिरंजीव नितेश, नीलेश, आमदार प्रसाद लाड, यात्रेचे कोकण विभागीयप्रमुख प्रमोद जठार इत्यादींनी कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रे दाखवण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करत तिथेच ठिय्या मांडला. अटक वॉरंट दाखवले नाही तर तिथून न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. अखेर पोलीस अधीक्षक गर्ग यांनी राणे यांची समजूत काढून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे महाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

राणे यांना रात्री साडेआठच्या सुमारास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रथमवर्ग दंडाधिकारी बाबासाहेब शेखपाटील यांच्यापुढे  हजर करण्यात आले. यावेळी राणे यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, राणे यांना अटक करण्यापूर्वी नोटीस दिली नाही, अटक चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणे यांची जामिनावर सुटका केली.

या सर्व घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर महाडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने महाड परिसरात तणाव निर्माण झाला होता. शिवसैनिकांनी नांगलवाडी फाटा येथे काळे झेंडे दाखवून राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडय़ांवर दगडफेक झाल्याचा आरोप यावेळी केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

भाजपतर्फे राज्याच्या निरनिराळ्या विभागांमध्ये सध्या जनआशीर्वाद यात्रा सुरू आहेत. त्यापैकी कोकण विभागाची यात्रा १९ ऑगस्टला मुंबईहून सुरू झाली. सोमवारी ती महाडमध्ये आली असता तेथील पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा संदर्भ दिला. ‘‘यंदाचा स्वातंत्र्यदिन हीरक महोत्सव की अमृत महोत्सव, अशी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली तेव्हा मी त्या ठिकाणी असतो, तर कानाखाली चढवली असती’’, असे आक्षेपार्ह विधान राणे यांनी केले. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. नाशिक, पुणे व महाड या तीन ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राणेंविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर दिवसभर पडसाद उमटले आणि पुढील अटकनाटय़ घडले.

भाजपच्या धसक्यामुळे सेनेचा रडीचा डाव

कोकणात भाजपने जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने उत्तम वातावरण निर्माण केले होते. भाजपचा माहोल सर्वदूर पसरला होता. त्यामध्ये खोडा घालण्याच्या कद्रू मनोवृत्तीतून हा रडीचा डाव खेळण्यात आला. पण, त्यामुळे भाजपचे वाढते महत्त्व कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

कोकणात संघर्ष

एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेची तयारी सुरू असतानाच खेड, चिपळूण, आरवली इत्यादी ठिकाणी सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमने-सामने येत जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व ठिकाणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत थेट संघर्ष टाळला. रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात भाजपतर्फे लावण्यात आलेले राणे यांच्या स्वागताचे फलक शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी फाडले. पण, राणेंच्या समर्थकांनी तेथे चपळाईने पुन्हा नवीन फलक आणून लावले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे शिवसैनिकांकडून राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी पोलीस व शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. अखेर पोलिसांनी नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा हिसकावून घेतला. त्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. राणे यांच्या सुटकेनंतर कोकणात हा संघर्ष आणखी पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन : भाजप

नारायण राणेंना अटक करून घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन करण्यात आल्याची टीका भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रांना मिळत असलेल्या मोठय़ा पाठिंब्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे. मात्र, अशा कारवायांना भाजप घाबरणार नसून, आम्ही लोकशाही मार्गाने लढू, असे नड्डा म्हणाले.

शिवसेनेकडून राजीनाम्याची मागणी

नारायण राणे यांनी अटकेमुळे घटनेचा आदर राखत केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य घृणास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असले तरी राणेंना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे राऊत म्हणाले. याबाबत राऊत यांनी पंतप्रधानांनाही पत्र पाठवले आहे.

पालकमंत्र्यांकडून देखरेख

संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे नारायण राणे यांच्याविरोधातील पोलिसांच्या कारवाईवर जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड्. अनिल परब रत्नागिरीतून लक्ष ठेवून होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत असताना त्यांच्याशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपर्क साधला तेव्हा, न्यायालयाच्या आदेशाची वाट बघत न बसता राणेंवर कारवाई करण्याचा आदेश परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर थोडय़ाच वेळात राणेंना ताब्यात घेण्यात आले.

संभाजी महाराज आणि राणे..

नारायण राणे यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर जनआशीर्वाद यात्रेचे समन्वयक प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना या परिसराच्या इतिहासाला उजाळा देत सरकारला लक्ष्य केले. ‘‘छत्रपती संभाजी महाराजांना याच परिसरात फंदफितुरीने अटक करण्यात आली. पण, त्यानंतरही औरंगजेबाला येथे यश आले नाही. उलट त्याचे थडगे बांधले गेले. त्याचप्रकारे या कारवाईमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे थडगे बांधले जाणार आहे,’’ असे जठार म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मी केलेले वक्तव्य हा गुन्हा होऊच शकत नाही. राज्यातील शिवसैनिकांना मी भीक घालत नाही. राज्य सरकारने सुडाचे राजकारण करू नये. – नारायण राणे, केंद्रीय मंत्री

राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण..

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही, त्यांनी संयम दाखवायला हवा होता. पण, राज्य सरकारने केलेल्या बेकायदा कारवाईविरोधात भाजप राणेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आंदोलने, घोषणाबाजी, धुमश्चक्री..

राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मुंबईत जुहू येथील राणेंच्या बंगल्याबाहेर युवासेनेचे कार्यकर्ते आणि राणेसमर्थक यांच्यात हाणामारी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मुंबईत ऑपेरा हाऊस, मालाडसह अन्य ठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली. ठाणे, कल्याण, उल्हासनगरमध्ये संघर्षांचे प्रकार घडले. कोकणात रत्नागिरी, राजापूर, कणकवली येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुणे, मराठवाडय़ातही आंदोलन झाले. नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयावर दगडफे क करण्यात आली. राणेंच्या अटकेनंतर आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनीही अनेक ठिकाणी निदर्शने केली.

मी नारायण राणे यांच्या विधानाला महत्त्व देत नाही. त्यांच्यावर जसे संस्कार झाले तसे ते बोलत आहेत.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस