रात्रीच्यावेळी घरफोडी करून लूट करणार्या चोरट्याला अटक करून पोलीसांनी तब्बल ३६ लाखांचा चोरीचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. पलूस येथे शेती करणारा हा तरूण चोरीचाच धंदा करीत होता, त्याच्याकडून रिव्हॉलव्हरही हस्तगत करण्यात आले आहे.
रमेश रामलिंग तांबारे (वय ४६ रा. पलूस) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्यांने सांगलीसह सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात १६ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. आणखी काही घरफोड्या उघड होण्याची शययता असल्याचे अधिक्षक बसवराज तेली यांनी सांगितले.
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १५६ ठिकाणचे चित्रीकरण तपासणी करून तब्बल ३७ गावातील माहिती संकलित करीत या अट्टल चोरट्यास गजाआड केले. त्याच्याकडून चोरीतील ६४ तोळे सोने आणि दोन किलो चांदीसह एक रिव्हॉल्व्हर, मोपेड गाडी असा एकूण ३६ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंद मेडिकल, दवाखाने आणि घरे यांना त्याने चोरीसाठी लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. दि. १४ मार्च रोजी सांगली शहरातल्या माधवनगर रोडवरील बाह्यवळण रस्ता या ठिकाणी रमेश तांबारे हा संशयितरित्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती, त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने तसेच एक रिव्हॉल्व्हर आढळून आली,त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता,त्याने सांगलीसह कोल्हापूर,सातारा जिल्ह्यात १६ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे,
ही कारवाई करणार्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाला २५ हजाराचे इनाम महानिरीक्षक फुलारी यांनी जाहीर केले.