मराठी भाषा आणि हिंदीचा वाद यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत त्यांचे विचार मांडले. भाषेचा अभिमान काय असतो? हे त्यांनी एक व्हिडीओ दाखवत सांगितलं. तसंच संत परंपरेने महाराष्ट्र घडवला आहे, आज आपल्याला, आपल्या राज्यकर्त्यांना विसर पडला आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. महत्त्वाचा माणसांना आपण सोयीस्करपणे विसरुन गेलो आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच सचिन तेंडुलकरचं राज ठाकरेंनी तोंड भरुन कौतुक केलं.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला कारण ती प्राचीन भाषा आहे-राज ठाकरे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कारण ती प्राचीन भाषा आहे म्हणून आणि आमच्याकडे वाद कसले सुरु आहेत? तर हिंदी लादण्याचे. हिंदी ही १५० किंवा २०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. हिंदी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा असेल तर अजून हजार वर्षे आहेत. आम्ही त्या वादात गुंतलो आहोत. भाषेचा कडवटपणा काय असतो? मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो. ही क्लिप बंगालमधली आहे. असं म्हणत राज ठाकरेंनी बंगालमधली माणसं हिंदीत बोलणार नाही बांगला भाषेत बोला हे सांगत आहे. बांगला येत नाही म्हटल्यावर ते लोक हिंदीत बोलले नाहीत. बंगाली लोक हिंदीत बोलणार नाहीत हे सांगत आहेत, किती कडवट आहेत तुम्ही पाहिलंत? तुम्ही जोपर्यंत कडवट होणार नाहीत तोपर्यंत गोष्टी अशाच होत राहणार असं राज ठाकरे म्हणाले.
सचिन तेंडुलकरचा मला अभिमान आहे-राज ठाकरे
वानखेडे स्टेडियमवरच्या कार्यक्रमात जेव्हा आमचा सचिन तेंडुलकर येतो ना, तेव्हा तो पहिलं भाषण मराठीत करतो, मला अभिमान वाटतो त्याचा. होय सचिन भारतरत्न आहे, पण आपली भाषा, आपलं राज्य, आपली जागा नाही विसरला. तर आमचे लोक इतर लोकांशी भांडतानाही हिंदीत भांडतात. बरं तुला हिंदी येतही नाही. त्यादिवशी कायकू म्हणालं हा शब्द कुठून आला? हा शब्द कुठल्याही भाषेत नाही. कुठल्याही भाषेला माझा विरोध नाहीच. आपण मार खातोय कुठे ते अशाच गोष्टींमुळे. आम्हाला कुणी काय सांगितलं? काय शिकवलं आहे ते विसरुन गेलो आहोत असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या वसंत व्याख्यान मालेत हे विचार त्यांनी मांडले आहेत.

आपल्याकडे लेखक कोण, कवी कोण? हे जातीतून पाहिलं जातं-राज ठाकरे
माझे एक मित्र टाइम्स ऑफ इंडियात होते, त्यांच्या मित्रांना घेऊन कुठे कर्जत वगैरे भागात गेले होते. ते मला म्हणाले मला पोहचायला तिथे उशीर झाला. मी पोहचलो तेव्हा आमच्या वृत्तपत्रात काम करणारे बंगाली मुलं मुली रविंद्रनाथ टागोरांच्या कविता आणि गाणी म्हणत होते. बंगाल सोडून महाराष्ट्रात आले आहेत, इथल्या वर्तमान पत्रात काम करुनही ते रविंद्र संगीत विसरले नाहीत आणि आपल्याकडे लेखक कोण आणि कवी कोण? हे जातीतून पाहिलं जातं. तुम्ही मराठी माणूस म्हणून एकत्र येऊ नयेत याचा पूर्णपणे बंदोबस्त केला आहे. आत्ता कुणीतरी ते संधीसाधू आहेत, या लोकांना माहिती काही नसते. ही सगळी माणसं इथे येणार आणि वाद पेटवणार. कोणतीही सद्य परिस्थिती ही तु्म्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही. हे सगळं जे वाटोळं झालं आहे त्याला कारणीभूत महाराष्ट्रातले राजकारणी आहेत दुसरं कुणीच नाही. महाराष्ट्रातला रिक्षांचा वगैरे प्रश्न आहे की मराठी बोललं पाहिजे. महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही हे सांगायची हिंमत कशी काय होते? ज्यावर मंत्री काय सांगत आहेत? की चार महिने अजून घ्या पण मराठी शिका. बाकीच्या राज्यात काय होईल जरा तुम्ही सांगा. पंजाबमध्ये पंजाबी बोलत नाही सांगितलं तर काय होईल? मराठी टिकवायची असेल तर वरपासून खालपर्यंत टिकवावी लागते. महाराष्ट्राचा ठसा आपल्या संतांनी, विचारवंतांनी आणि महापुरुषांनी उमटवला आहे ना, मग त्याचा विसर का पडतोय? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
दादासाहेब फाळके, माशेलकर अशा अनेकांचा विसर आम्हाला पडला आहे-राज ठाकरे
सचिन तेंडुलकर हा महाराष्ट्रातला एकमेव खेळाडू आहे ज्याला भारतरत्न मिळालं. आम्हाला काय? मॅच बघतो आहे, संपतो विषय. इतर राज्यांमध्ये काय केलं असतं? विचार करा. आज दादासाहेब फाळके यांची जयंती आहे. आपल्याला कुणालाही माहीत नाही. आज आपण ओटीटी पाहतोय, चित्रपट पाहतोय. चित्रपट ज्या माणसाने बनवला त्या दादासाहेब फाळकेंचा आम्हाला विसर पडला आहे. सत्यजीत रे यांना ऑस्करचा लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला पण दादासाहेब फाळके, व्ही शांताराम यांना नाही मिळाला. आमच्या पुढाऱ्यांना, राज्यकर्त्यांना वाटलं पाहिजे की आपल्या माणसांना मोठं केलं पाहिजे. पण सगळा निरुत्साह दिसतो. आमच्या लोकांना मोठं म्हणण्यातच पाप वाटू लागलं. सायन्स अँड टेक्नॉलॉजीत मराठी माणसं आहेत. रघुनाथ माशेलकरांनी हळदीचं पेटंट अमेरिकेशी भांडून आपल्या देशासाठी मिळवलं आपल्याला माहीतच नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी हे विचार मांडले.
