Zomato Swiggy Delivery Boy Struggle Heatwave: महाराष्ट्र आणि भारतात उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवास मिळत आहेत. उकाड्याने अनेक वर्षांचे विक्रम मोडीत निघाले असून दुपारी घराबाहेर काम करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अशावेळी भर उन्हात काम करणे अपरिहार्य असणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पुण्यात रविवारी पारा ४१.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. मे महिन्यातील सर्वाधिक तापमानाचा मागच्या १० वर्षांचा विक्रम मोडला गेला. पुणेकर घरातच रविवार घालवत असताना. खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणारे मात्र अन्न पोहोचवण्यासाठी धावपळ करत होते.
मुंबई आणि पुणे या मेट्रो शहरांमध्ये फूड डिलिव्हरी हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. कडक उन्हातही रस्त्यांवर कंपनीचे टी-शर्ट, हेल्मेट, दुचाकीला पुढे लावलेला मोबाइल, खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वापरात येणारी मोठी बॅग घेऊन डिलिव्हरी एजंट इथून-तिथून पळताना दिसतात.
द इंडियन एक्सप्रेसने भरदुपारी रणरणत्या उन्हात काम करणाऱ्या डिलिव्हरी एजंटशी संवाद साधून यावर एक लेख प्रकाशित केला आहे. फूड डिलिव्हरीवर दुपारी काम करण्यासाठी इन्सेंटिव्ह मिळत असल्यामुळे अनेक डिलिव्हरी एजंट ऊन वगैरे न पाहता काम करतात. पुण्यातील कात्रज-बिबवेवाडी येथे स्विगी डिलिव्हरी करणाऱ्या राजू घुबे यांनी सांगितले की, दुपारी १२ ते ४ वाजण्याच्या सुमारास पावणे तीन तास काम केल्यास आम्हाला इन्सेंटिव्ह मिळतो. पण डिलिव्हरीत एक मिनिटही इकडचा तिकडे जाऊ द्यावा लागत नाही. अन्यथा इन्सेंटिव्ह मिळत नाही. त्यामुळे कडक उन्हात पळत राहणे एक अवघड काम आहे.
मुंबईत ७ मे पासून येलो अलर्ट देण्यात आला आहे. तरीही मुंबईतील तेजस पाटील झोमॅटोसाठी १२ तासांची शिफ्ट करतो. या काळात काही क्षण आराम करायचा म्हटला तरी आमचे खुप मोठे नुकसान होऊ शकते. जर मी पाणी पिण्यासाठी १० मिनिटे किंवा काही वेळ आराम करण्यासाठी निवाऱ्याखाली बसलो तरी कंपनीकडून माझी पुढची डिलिव्हरी रद्द केली जाते. जर माझ्या दोन ऑर्डर रद्द झाल्या किंवा स्वीकारल्या गेल्या नाहीत. तर त्यादिवसाचा माझा इन्सेंटिव्ह मला गमवावा लागेल.

उन्हापासून वाचण्यासाठी पाटील स्वतःचे डोके झाकून घेतो आणि दिवसभर स्वतःकडे पाण्याची बाटली ठेवतो. स्विगी राइडर सलीत मुखिया उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून दिवसाला २०० रुपये खर्च करतो. सब्जाचे पाणी, काकडी आणि ज्यूसचा वापर करून स्वतःला हाइड्रेट ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी करणारी मुले महिन्याला सुमारे २६,५०० रुपये कमावतात. पैसे कापल्यानंतर हातात जवळपास २१ हजार रुपये येतात. मात्र उन्हामुळे खर्चात आणखी वाढ होत आहे.
निवारा नाही, पाणी नाही
पुण्यातील शिवाजीनगर भागात डिलिव्हरी करणाऱ्या परशुराम कांबळेने सांगितले की, या भागात उद्यानाची संख्या अपुरी आहे आणि जे आहेत, ते दुपारी बंद असतात. त्यामुळे दुपारी ऊन टाळण्याचा खटाटोप करावा लागतो. मुंबईतही तशीच परिस्थिती आहे. झोमॅटो राइडर अजित खोपेने सांगितले की, एखाद्या हॉटेलचा मालक चांगला असतो. रेस्टॉरंट मोकळे असेल तर आम्हाला आत एसीत बसण्याची परवानगी दिली जाते. पण ग्राहक येण्यास सुरुवात झाली तर मग आम्हाला बाहेर वाट पाहण्यास सांगितले जाते.
महाराष्ट्र सरकारची नियमावली
उन्हाळ्यात बाहेर काम करणाऱ्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यामध्ये कामाचे तास लवचिक ठेवून ऊन्हाची वेळ टाळणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात ओआरएसची पाकिटे वाटणे, असे पर्याय सुचविले आहेत. मुंबई आणि पुण्याप्रमाणे उष्माघाताचा धोका असलेल्या किमान १५ शहरांमधील बाह्य कामगारांसाठी अशाचप्रकारची नियमावली तयार करण्यात आली आहे.
‘अल्गोरिदमला आमचे दुःख कळणार नाही’
दिव्यांगासाठी परिस्थिती आणखी आव्हानात्मक आहे. गिरीश पाटेकर हे पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरात बॅटरीवर चालणाऱ्या व्हीलचेअरवरून डिलिव्हरी करतात. २०१८ मध्ये त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे त्यांचा शरीराचा कमरेखालचा भाग अधू झाला. “माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस असो, थंडी पडो किंवा प्रचंड उकाडा असो काम केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही”, अशी प्रतिक्रिया पाटेकर यांनी दिली.

पाटेकर यांचे सहकारी दिवसाला १५ ते ३० ऑर्डर डिलिव्हरी करत असताना ते मात्र चार ते पाच ऑर्डर डिलिव्हर करतात. सायंकाळी वाहतूक कोंडी वाढल्यानंतर त्यांच्या व्हिलचेअरची बॅटरी वेगात उतरू लागते. त्यामुळे दुपारी रस्ता मोकळा असताना भर ऊन्हात त्यांना डिलिव्हरीचे काम करावे लागते.
प्लॅटफॉर्म काय सांगतात?
डिलिव्हरी राइडरच्या समस्येबाबत कंपन्यांकडे चौकशी केली असता झोमॅटोने सांगितले की, डिलिव्हरी राइडरसाठी देशभरात ५००० रेस्ट पॉईंट्स देण्यात आले आहेत. रेस्टॉरंट, पेट्रोल पंप आणि सर्व्हिस स्टेशनला त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी निवारा आणि शौचालय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तर स्विगीने म्हटले की, आम्ही आमच्या राइडर्सना कुलिंग वेस्ट आणि ग्लुकोजयुक्त पाणी किंवा ग्लुकोज पावडरचे पाकिटे मोफत देत आहोत. तसेच दुपारी जेवणाच्या वेळेस कामाच्या वेळा लवचिक ठेवण्यात आल्या आहेत. दुपारी राइडर्स कोणत्याही वेळेस ऑफलाइन जाऊ शकतात, यासाठी त्यांना कोणताही दंड आकारण्यात येणार नाही, अशी माहिती स्विगीच्या प्रवक्त्यांनी दिली.
