Rahul Narwekar on Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अलिबागमधील कथित व्हिडिओ समोर आल्यापासून राहुल नार्वेकर आणि संजय राऊत यांच्यातील द्वंद्व वाढलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज राहुल नार्वेकर नागपुरात असताना माध्यमांनी त्यांना त्या व्हिडिओविषयी विचारलं. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. पर्यावरण संसद कार्यक्रमासाठी राहुल नार्वेकर नागपुरात गेले होते.
संजय राऊतांनी व्हिडिओद्वारे केलेल्या आरोपांवर राहुल नार्वेकर म्हणाले, “संजय राऊतांच्या आरोपांवर यापूर्वीही बोललो नाही. बोलूही इच्छित नाही. या सर्व मनातील कल्पना आहे. त्यांचं जुनं दुखणं समोर येत आहे. ते का बोलतात, कशाला बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही.”
“अलिबाग माझं गाव आहे, माझी शेती आहे. माझी शेती बघायला गेलो होतो. शेतातून पायी जात असताना दोघांमध्ये वाद होताना दिसला. त्यामुळे त्यांना सांगितलं की मारामारी करू नका, शांतपणे विषय सोडवा. त्या जागेशी, घटनेशी माझा संबंध नाही. मोजणीसाठी मी अर्ज केलेला नाही. ज्या जागेवर मोजणी होत होती, तीही माझी नाही. त्यामुळे अशा चिप स्टंटना यापुढेही उत्तर देऊ इच्छित नाही”, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं.
पणजोबांपासून आमच्या तिथे जमिनी
तसंच, “त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील, ज्या खोट्या स्टोरीज असतील त्यांनी खुशाल समोर आणू देत. संजय राऊतांना कल्पना आहे की माहीत नाही. १५० वर्षांपासून आमचं तिथे वास्तव्य आहे. पणजोबांपासून तिथे आमच्या जमिनी आहेत. खासदार बनण्याआधी संजय राऊतांची अलिबागमध्ये किती जमीन होती आणि त्यानंतर कोणाच्या नावाने किती जमिनी घेतल्या आहेत, याचा हिशोब त्यांनी द्यावा”, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.
पत्राचाळ विषय अजून कोणी विसरलं नाही
“माझा राजीनामा घेणं ही त्यांची पूर्वीपासूनची इच्छा आहे. विधानसभा अध्यक्षांवर काहीही आरोप केले जातात. पण विधानसभा अध्यक्ष कधीही तत्वांशी तडजोड करून काहीही करत नाही. संजय राऊत स्वतः मोठ्या जमीन घोटाळा प्रकरणात तुरुंगातून जाऊन आलेत, ते दुसऱ्यांना काय शिकवणार? अजूनही कोणी पत्राचाळ विसरलं नाहीय”, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.

