राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तीन भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र आले आहेत. त्यात काँग्रेस आणि शिवसेना सरकार बनवण्यासाठी एकत्र कसे येऊ शकतात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसला शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी कसे राजी केले ती गोष्ट उलगडून सांगितली.

महाविकास आघाडी साकारण्यात शरद पवारांची महत्वाची भूमिका आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायला तयार आहे याची खात्री पटल्यानंतर मी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना जाऊन भेटलो व त्यांना कल्पना दिली असे शरद पवार यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये नव्याने निवडून आलेले आमदार भाजपाला वगळून सरकार स्थापनेसाठी अनुकूल होते. शिवसेनेबरोबर आघाडी करायला राष्ट्रीय पातळीवर जितका विरोध होता तितका राज्य पातळीवर नव्हता.

काँग्रेस सातत्याने शिवसेनेला विरोध करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. शिवसेनेच्या भूमिकेला नेहमीच विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या आघाडीसाठी अनुकूल नव्हत्या. पण काँग्रेसने इतकी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही हे पटवून देण्यासाठी मी त्यांना तीन उदहारण दिली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. ठाणे महापालिकेत बाळासाहेबांनी कशा प्रकारे काँग्रेसला सहकार्य केले होते तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएमध्ये असूनही त्यांनी काँग्रेसने दिलेले उमेदवार प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या बाजूने मतदान केले होते.

या तीन गोष्टी मी वारंवार सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये असताना सोनिया गांधींनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्या महाविकास आघाडीसाठी तयार झाल्या अशी माहिती शरद पवार यांनी दिली.