सिया गोयल या तरुणीने तिचा होणारा नवरा केतन अग्रवालला लोहगडावरुन दरीत ढकललं आणि त्याची हत्या केली, तिला तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीने साथ दिली असाही आरोप आहे. या घटनेमुळे पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सियाने केतन अग्रवाल हा पाय घसरुन दरीत पडला असा बनाव रचला होता. मात्र केतन हा चांगला ट्रेकर होता असं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आणि सियावर संशय व्यक्त केला. केतनच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी सिया केतनच्या घरी गेली होती. त्यावेळी केतनच्या बहिणीने सियाला काही प्रश्न विचारले ज्यामुळे तिच्यावरचा संशय बळावला अशी माहिती आता समोर आली आहे.
१८ जून रोजी नेमकं काय घडलं ?
१८ जूनला सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे दोघंही लोहगडावर फिरायला गेले. लोहगडावरुन सेल्फी घेत असताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला अशी माहिती सियाने अग्रवाल कुटुंबाला दिली. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि केतनचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम भागात असलेल्या दरीत केतनचा मृतदेह पोलिसांना सापडला. केतनला ट्रेकिंगची आवड होती त्यामुळे तो पडला कसा? याबाबत अग्रवाल कुटुंबाला संशय होता, पोलिसांना ही बाब सांगितल्यानंतर पोलिसांनी हा पैलू लक्षात घेत तपास सुरु केला आणि केतनचा अपघाती मृत्यू नाही तर हत्या झाल्याची बाब समोर आली. सियानेच हा सगळा कट चेतनशी म्हणजेच तिच्या प्रियकराशी संगनमत करुन रचला होता असंही समोर आलं.

सियावर केतनच्या बहिणीला संशय नेमका कसा आला?
केतन आणि सिया १८ जूनला लोहगडावर गेले होते. तिथे सियाचा प्रियकर चेतन चौधरीही आला होता. या दोघांनी केतनला ढकललं आणि त्याची हत्या केली. त्यानंतर सियाने केतन पाय घसरुन पडल्याचा बनाव रचला. केतनच्या घरातल्यांना फोन करुनही हेच सांगितलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ जूनला सियाचा वाढदिवस होता. तिने केतनसाठी शोक व्यक्त करणारं भावनिक स्टेटस ठेवण्याचं ढोंगही केलं. त्यानंतर ती केतनच्या कुटुंबाला भेटायला आणि त्यांचं सांत्वन करायला गेली. सुरुवातीला केतनच्या घरातल्या वाटलं की सिया खरं बोलते आहे. पण केतनच्या बहिणीने सियाला प्रश्न विचारले. केतन कसा पडला? तू त्याला वाचवलं का नाही? तू तेव्हा नेमकी कुठे होतीस? हे आणि असे काही प्रश्न विचारले ज्यापैकी काही प्रश्नांची उत्तरं सिया देऊ शकली नाही. लोहगडावर नेमकं काय घडलं ते सांग याचंही उत्तर सिया देऊ शकली नाही. त्यामुळे केतनच्या बहिणीला सियावर संशय आला. केतनच्या बहिणीन आपण काय प्रश्न विचारले आणि त्यावर सिया कशी गप्प बसली होती हे कुटुंबाला सांगितलं. त्यानंतर कुटुंबाने लोहगडाचं १८ जूनचं सीसीटीव्ही फुटेज तपासावं अशी विनंती पोलिसांना केली. पोलिसांनी कुटुंबाच्या विनंती अर्जानंतर लोहगडाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं ज्यानंतर या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातले काही ठळक मुद्दे
१) १८ जून रोजी केतनला जेव्हा सियाने ढकललं तेव्हा तो जवळपास ४०० फूट खाली दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
२) सियाने केतनच्या कुटुंबाला हे सांगितलं की केतन सेल्फी घेताना दरीत कोसळला.
३) केतनच्या कुटुंबाने पोलिसांना तातडीने याबाबत सूचना दिली. पोलीस घटना स्थळी पोहचले तेव्हा शोध घेताना लोहगडाच्या पश्चिमेला पोलिसांना दरीत केतनचा मृतदेह आढळून आला.
४) प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी केतन अग्रवालच्या अपघाती मृत्यूची नोंद केली. पण नंतर या घटनेमागे संशयास्पद पैलू असल्याचं पोलिसांना लक्षात आलं.
५) पोलिसांनी सगळा घटनाक्रम तपासला तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच कट रचून केतनला ठार केलं आहे. ज्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली.
६) सिया गोयलने तीन ते चार वेळा केतनला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. तिचा १८ जूनचा प्रयत्न यशस्वी झाला असा आरोप अग्रवाल कुटुंबाने केला आहे.
