Transfer Voter ID Card After Marriage: मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, शहरांतील सत्तासमीकरण ठरवण्याची जबाबदारी आता मतदारांच्या हाती आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, मतदान करण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र असणे पुरेसे नसून, मतदार यादीतील पत्ता आणि वास्तव पत्ता एकसारखा असणेही तितकेच गरजेचे आहे.
विशेषतः लग्नानंतर अनेक महिलांचे राहण्याचे ठिकाण बदलते. अशा वेळी जुन्या पत्त्यावर नोंद असलेले मतदान ओळखपत्र असल्यास मतदान करताना अडचणी येऊ शकतात, त्यामुळे २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विवाहित महिलांसह पत्ता बदललेल्या सर्व मतदारांनी आपले मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर ट्रान्सफर करून घेणे आवश्यक आहे.
मतदार ओळखपत्र (Voter ID) हे केवळ मतदानासाठीच नव्हे, तर भारतीय नागरिकत्वाचा एक महत्त्वाचा ओळख पुरावाही आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली असून, घरबसल्या काही मिनिटांत अर्ज करता येतो.
लग्नानंतर मतदान ओळखपत्र ट्रान्स्फर करणे का गरजेचे?
- मतदान केंद्र नवीन पत्त्याजवळ मिळण्यासाठी
- मतदार यादीत योग्य पत्त्यावर नाव नोंद राहण्यासाठी
- मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण टाळण्यासाठी
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी
आवश्यक कागदपत्रे (कोणतेही एक)
- मागील १ वर्षातील युटिलिटी बिल (वीज, पाणी, गॅस)
- आधार कार्ड
- राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक
- भारतीय पासपोर्ट
- नोंदणीकृत भाडे करार किंवा लीज करार
- नोंदणीकृत विक्री करार
- शेतकरी खातेवही व जमिनीचे कागदपत्र (लागू असल्यास)
ऑनलाइन अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
पायरी १:
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) वेबसाइटला भेट द्या.
पायरी २:
होमपेजवर दिसणाऱ्या ‘Shifting of Residence’ या पर्यायावर क्लिक करा आणि Form 8 निवडा.
पायरी ३:
‘Self’ वर क्लिक करून तुमचा EPIC (Voter ID) क्रमांक टाका आणि सबमिट करा.
पायरी ४:
स्क्रीनवर दिसणारी मतदार माहिती तपासा आणि ‘Shifting of Residence’ या पर्यायावर पुढे जा.
पायरी ५:
राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि नवीन पत्ता भरा.
पत्ता पुराव्याचा दस्तऐवज अपलोड करा.
पायरी ६:
कॅप्चा कोड भरून फॉर्म सबमिट करा.
सबमिट केल्यानंतर अॅप्लिकेशन रेफरन्स नंबर मोबाईल व ई-मेलवर मिळेल.
पायरी ७:
अर्ज मंजूर झाल्यानंतर NVSP पोर्टलवरून डिजिटल मतदान ओळखपत्र डाउनलोड करता येईल.
महत्त्वाच्या टिप्स
- निवडणुकीपूर्वी किमान काही आठवडे आधी अर्ज करा
- पत्ता बदलल्यानंतर मतदार यादीत नाव तपासणे विसरू नका
- अर्जाची स्थिती रेफरन्स नंबरद्वारे ट्रॅक करा
- मतदानाच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच पाहून ठेवा.
