Toll Free at Mumbai Pune Route : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता गॅस टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली होती. परिणामी सायंकाळी ५ वाजल्यापासून माहमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तब्बल २४ तासांच्या प्रयत्नानंतर गॅस गळती थांबवण्यात यश आलं असून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत. गॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखी वाढून मोठे नुकसान झाले असते, त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. परिणामी द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी अथक २० तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
टोलवसुली थांबवली
दरम्यान प्रवाशांना एमएसआरडीसीकडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स देण्यात आले. एवढेच नाहीतर वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल असे सांगून त्यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चाही केली आणि एक आपत्कालीन आराखडा तयार करण्यास सांगितले.
महामार्गावरून एका वाहिनेवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या ९ ते १० किमी लांब रांगा लागल्या असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. वाहनचालक – प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तर पथकर वसुलीही थांबविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली.

