पाताळगंगा नदीत बुधवारी दुपारी तीन हजारहून अधिक सिलेंडर वाहून आले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली. नदीतून वाहून येणाऱ्या हजारो सिलेंडर्सला घेण्यासाठी खारपाडा झुंबड उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर वाहून कसे आले याचा थोडक्यात आढावा…
झाले काय?
बुधवारी दुपारी तीन साडे तीनची वेळ, मुंबई गोवा महामार्गावरवर वाहनांची वर्दळ सुरळीत सुरू होती. पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे नद्यां नाले ओसंडून वाहत होते. खारपाडा पूलाखालून पाताळगंगा नदी दुथडीभरून वाहत होती. याच वेळी पूलावरून जाणाऱ्या काही प्रवाश्यांना नदी पात्रातून गॅस सिलेंडर वाहून येतांना दिसले. थोड्या वेळाने सिलेंडर वाहून येण्याचे प्रमाण अधिकच वाढले. हजारो सिलेंडर पाण्याच्या प्रवाहासोबत नदी पात्रातून वाहून येऊ लागले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रवाश्यांनी या घटनेची वर्दी स्थानिक प्रशासनाला दिली. तेव्हा हे सिलेंडर एचपीसीएल कंपनीचे असल्याचा खूलासा झाला.
गॅस सिंलेंडर नदी पात्रात आले कुठून ?
नदी पात्रातून हजारो सिलेंडर वाहून येऊ लागल्याने, प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या. त्यांनी सिलेंडर कुठून आले त्याचा मागोवा घेण्यास सुरूवात केली. तेव्हा हे सर्व सिलेंडर एचपीसिएल कंपनीचे असल्याचा खुलासा झाला. पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमध्ये चावणे येथे बॉटलींग प्लांटमधून वाहून आल्यची बाब समोर आली. खालापूर परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदी आधीच दुथडी भरून वाहत होती. यातच रसायनी चावणे परिसरात आलेल्या अतिवृष्टीमुळे एचपीसीएल कंपनीच्या बॉटलींग प्लांटमध्ये अचानक पूरस्थिती उद्भवली. यावेळी एलपीजी गॅस पुर्नभरणासाठी आलेले हजारो सिलेंडर कंपनीच्या परिसरात ठेवण्यात आले होते. हे सिंलेडर पाण्याच्या प्रवाहासोबत नदी पात्रात वाहून गेले. पाण्याचा लोट इतका वेगवान होता की सिलेंडरला वाहून जाण्यापासून रोखण्याची संधीही मिळाली नाही. प्राथमिक माहितीनूसार जवळपास तीन हजार सिलेंडर पाण्याच्या प्रवाहासोबत पाण्यात वाहून गेल्याचे समोर आले.
सिलेंडर फुटण्याचा आणि गॅस गळतीचा धोका किती ?
नदी पात्रात वाहून आलेले गॅस सिलेंडर काही रिकामे तर काही भरलेले आहेत. रिकाम्या सिलेंडरमुळे कुठलाही धोका संभावत नसला तरी भरलेल्या गॅस सिलेंडरमुळे धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भरलेला सिलेंडर जोरात आपटल्यास अथवा फुटल्यास त्यातून गॅस गळती होऊ शकते, त्यामुळे सिलेंडर हाताळतांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. नदी पात्रातील सिलेंडर जीव धोक्यात घालून हाताळणी करण्याचा प्रयत्न करून नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाचे आवाहन काय?
जिल्हा प्रशासनाने एचपीसीएल कंपनीला लेखी पत्र देऊन तातडीने सिलेंडर उचलून ताब्यात घ्यावे, नागरिकांना काय करावे आणि काय करु नये याच्या सुचना द्याव्यात, गरज पडल्यास स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने सिलेंडर ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी.सिलेंडरमुळे नागरिकांच्या जिविताला कुठलाही धोका होणार नाही याची काळजी घ्यावी असे पत्र जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कंपनी प्रशासनाला तसेच उपमहाव्यवस्थापन एलपीजी सर्व्हीसेस यांना दिल्या आहेत. नागरिकांनी सिलेंडर जवळ जाऊ नये, ते आढळून आल्यास ते कंपनी प्रशासनास परत द्यावेत. तहसिलदार कार्यालयात, अथवा प्रांताधिकारी कार्यालयात आणून द्यावे अथवा स्थानिक गॅस वितरकांच्या ताब्यात द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
किती सिलेंडर गोळा करण्यात यश ?
प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार वाहून गेलेल्या तीन हजार सिलेंडर पैकी जवळपास २ हजार सिलेंडर गोळा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. उर्वरीत सिलेंडर्सचा शोध सुरू आहे. रात्र झाल्यामुळे शोधमोहीमेत अडचणी येत आहेत.
