करोना प्रादुर्भावानंतर राज्यात पहिल्यांदाच इयत्ता बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. राज्यभरात 14 लाखापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले असून आजपासून परीक्षेला सुरुवात झालीय. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. राज्यातील एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणी येत आहेत. तसेच करोना प्रादुर्भावाचे संकट असूनदेखील विद्यार्थ्यांना खासगी वाहनांतून गर्दीमध्ये प्रवास करावा लागतोय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झालीय. करोना प्रादुर्भावामुळे ज्या ठिकाणी शाळा त्याच ठिकाणी परीक्षा असे सूत्र शिक्षण मंडळाने ठरवले आहे. विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये हा यामागील उद्देश आहे. मात्र, राज्यातील काही ग्रामीण भागात प्रवासाची सुविधा नसल्यामुळे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्त पैसे मोजावे लागले. एकीकडे करोना संसर्गाचा धोका असल्यामुळे करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आव्हान विद्यार्थांसमोर आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात संप असल्यामुळे परीक्षा केंद्रावर कसे पोहोचावे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकलाय.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

प्रवासासाठी एसटीची पुरेशी सुविधा नसल्यामुळे ग्रामीण भागात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास करताना अनेक अडचणी येत आहेत. यवतमाळमधील एका विद्यार्थिनीने याच अडचणीबद्दल माहिती दिलीय. “एसटी बस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय. खासगी गाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहनांमध्ये प्रवाशांची खूप गर्दी असते. करोना संसर्गाची भीती असूनदेखील या गर्दीतून प्रवास करावा लागतोय. एसटी बसेस सुरु झाल्या तर आम्हाला परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचता येईल,” असं विद्यार्थिनीने सांगितलंय. तसेच परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरात लकवर एसटी बसेस सुरु कराव्यात, अशी मागणी या विद्यार्थिनीने केलीय.

दरम्यान, राज्यात एकूण १४ लाख ८५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरलेले आहेत. तर विद्यार्थ्यांची संख्या पाहता राज्यात एकूण ९ हजार ६३५ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आलीय. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून जेथे शाळा तिथेच परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आलीय. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन या परीक्षांचे आयोजन केल्याचा दावा शिक्षण मंडळाने केलाय.