कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन
विविध चोवीस प्रकारच्या मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका संथगतीने तपासण्याच्या आंदोलनाचा निर्णय महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाने घेतला आहे. विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनही (विज्युक्टा) या आंदोलनात सहभागी असल्याची माहिती महासंघाचे पदाधिकारी प्रा.भास्कर केंढे आणि ‘विज्युक्टा’चे प्रा. अनंत पांडे यांनी येथे दिली.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी संबंधित विषयाच्या प्राध्यापकाला दररोज २५ उत्तरपत्रिका उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे दिल्या जातात व त्यांचे मूल्यांकन करवून घेतल्या जाते. मात्र, आता या आंदोलनामुळे प्राध्यापक दररोज केवळ एक उत्तर पत्रिका तपासणार आहेत. या आंदोलनाला बहिष्कार आंदोलन असे आम्ही म्हटले नाही कारण त्याचा अर्थ एकही उत्तर पत्रिका तपासू नये असा होतो. आमचे हे आंदोलन असहकार आंदोलन आहे, सरकारला आमचा या आंदोलनाच्या निमित्ताने इशारा आहे. जर मागण्यांबाबत शासन ठोस निर्णय घेणार नसेल तर आंदोलन तीव्र केल्या जाईल, असेही संघटनेने म्हटले आहे.
आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या तीन वषांपासून आंदोलन सुरू आहे. पण सरकार मात्र तोंडाला आश्वासनांची पाने पुसण्यापलीकडे काही करत नसल्याचा आरोप प्रा. केंढे यांनी केला आहे. संघटनेच्या वतीने सर्व प्राचार्याना आम्ही पत्र लिहुन आंदोलनाची कल्पना दिली आहे.
प्राचार्यानी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालकांना तसे कळवण्याचेही आम्ही सांगितले आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रा. अरिवद देशमुख यांनीदेखील या आंदोलनाची कल्पना सरकारला दिली आहे. आमच्या २४ मागण्या असून प्रामुख्याने वेतन आणि सेवानिवृत्ती वेतनासंबंधी मागण्यांकडे सरकार डोळेझाक करीत आाहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संथगतीने चालणार असून त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांचे बारावीचे निकाल उशिरा लागण्यावर होणार असल्याचे आम्ही सरकारला कळविले आहे. आता विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही म्हणून सरकारनेच तातडीने आमच्या मागण्या मान्य कराव्या, असे प्रा. केंढे यांनी म्हटले असून राज्यभर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संथ गतीने करण्याचे आंदोलन यशस्वी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.