अलिबाग : विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरची दिशा ठरविणा-या बारावी परीक्षेचा निकाल‌ शनिवारी (ता.२) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९३.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.१३ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.२२ टक्के इतके आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी, मार्च २०२६मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शनिवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. बारावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३० हजार ५५८ विद्यार्थ्यानी अर्ज भरले होते. त्यापैकी ३० हजार ४७० विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले.‌ यामधील २८ हजार ५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल ९७.११ टक्के श्रीवर्धन तालुक्याचा लागला असून, सर्वात कमी ८५.०२ टक्के निकाल खालापूर तालुक्याचा लागला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शाखानिहाय जिल्ह्याचा निकाल

विज्ञान शाखा: ९८.५७ टक्के
कला शाखा: ८६.०३ टक्के
वाणिज्य शाखा: ९१.२९ टक्के
किमान कौशल्य शाखा: ८९.५९ टक्के
तंत्रविज्ञान: ९२.४० टक्के

तालुकानिहाय निकाल (टक्केमध्ये)

पनवेल ९४.७३, उरण ९४.०३, कर्जत ९६.३१, खालापूर ८५.०२, सुधागड ८८.४४, पेण ९३.९४, अलिबाग ९५.३९, मुरूड ८८.४६, रोहा ९४.२९, माणगाव ९३.५१, तळा ९६.६९, श्रीवर्धन ९७.११, म्हसळा ९६.३१, महाड ९२.७३, पोलादपूर ८८.८४ टक्के.