मुंबई : राज्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत यश मिळविलेले सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कल विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी, ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीला आज फळ मिळाले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांच्या पालकांचा त्याग आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन याचाही वाटा आहे. या परीक्षेतील यशानंतर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

पुढील उच्च शिक्षणासाठी ज्या ज्या क्षेत्रात विद्यार्थी जातील त्या क्षेत्रात महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शब्दांत भुसे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला.