राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असताना बुधवारी सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज कृषी आयुक्तालय आणि कृषी हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात बहुतांश ठिकाणी बुधवारी पावसाळी वातावरण होते. त्यामुळे द्राक्ष, भात, भाजीपाला, आंबा आणि फळ पिकांच्या बहारावर परिणाम होणार असल्याचे कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. नाशिकची द्राक्षे लंडनसह परदेशातील बाजारपेठांत निर्यात होतात. हे पीक भिजल्यास त्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे कृषी हवामानशास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे कोकणातील काढणीला आलेली भात पिके धोक्यात आली आहेत. तसेच आंब्याचा मोहोर लांबण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

सांगली आणि पुणे जिल्ह्यातील अंजीर आणि द्राक्ष पिकांचे, फुलशेतीचेही नुकसान होणार आहे. खरिपानंतर आता रब्बी हंगामावरही अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचा विपरीत परिणाम दिसून येणार आहे. कोिथबीर आणि मेथी या पिकांना जास्त पाऊस चालत नसल्याने या पिकांचेही नुकसान होणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांत भाजीपाला व फळबागांत पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मराठवाडय़ात तूर, कांदा, हरभरा पिकाला फटका

मराठवाडय़ात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिले. बुधवारी औरंगाबाद शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ऐन हिवाळय़ात तयार झालेल्या पावसाळी वातावरणाचा तूर, कांदा, हरभरा पिकाला फटका बसणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. डाळिंब, मोसंबी उत्पादकांचीही चिंता वाढवली आहे. पुढील दोन दिवसांत उत्तरेकडून आलेले थंड वारे अधिक सक्रिय असणार असून त्यातून जळगाव, धुळे भागात गारपिटीची शक्यता आहे. ३ डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने चक्रीवादळाची शक्यता आहे. मात्र, हे वातावरण बंगालकडे जाईल. तसेच ध्रुवीय वाऱ्याची तीव्रता वाढल्यामुळे आणखी दोन दिवस बोचरी थंडी अनुभवण्यास मिळणार आहे, असे एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम विज्ञान व अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरीवर परिणाम

थंडीच्या हंगामात ढगाळ हवामान, सूर्यप्रकाशाची उणीव यामुळे रब्बी पिकाबरोबरच, द्राक्ष, डािळब, स्ट्रॉबेरीला बुरशीजन्य रोगांचा सामना करावा लागत आहे.  

महाबळेश्वर, जावळी, वाई तालुक्यातील स्ट्रॉबेरी तयार होण्याच्या स्थितीत असताना ढगाळ हवामानामुळे दावण्या, भुरी या बुरशीजन्य रोगांना पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

दरांमध्ये वाढ

टोमॅटोचे उत्पादनच घटले असून झाडावरील टोमॅटो, वांगी यांच्यावर कीड पडल्याने बाजारात मालच उपलब्ध होत नसल्याने दरही वाढले आहेत.

या पावसामुळे आंबा, भाजीपाला यांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. भातपीक आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी मात्र हा पाऊस फायद्याचा ठरेल.

ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge crop damage expected due to unseasonal rains zws
First published on: 02-12-2021 at 00:24 IST