माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाबद्दल जिल्ह्य़ात अनेकांनी शोक व्यक्त केला. राजकीय वर्तुळात सर्वच पक्षीयांनी त्यांना श्रध्दांजली वाहताना ग्रामीण भागाची उत्तम जाण असलेला नेता हरपल्याचे नमूद केले. अनेकांनी त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
महापौर तथा आमदार संग्राम जगताप- आबा सर्वसामान्यांचे नेते होते. मंत्रिपदाची त्यांची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट होती. निवडणुकीनंतर माझी व त्यांची चार ते पाच वेळा भेटही झाली. एक आपलासा वाटणारा नेता हरपला याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच महाराष्ट्रातील नागरिकांनाही दु:ख आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे- आर. आर. पाटील यांच्या निधनाने ग्रामीण भागाची मोठी हानी झाली आहे. सोज्वळ, कष्टाळू स्वभावाच्या आर. आर. पाटील यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला होता. राजकारण आणि समाजकारणात काम करताना त्यांनी अतिशय परिश्रम घेतले. राजकीय विरोधक असले तरी त्यांनी सर्वांनाच कामातून मित्रत्वाची वागवणूक दिली. आपले ते व्यक्तिगत मित्र होते. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली. विखे कुटुंबीय आणि प्रवरा परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.
पोपटराव पवार- आबांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनाने राज्याचेच नुकसान झाले आहे. ग्रामीण जीवनाबद्दल अत्यंत संवेदनशील असलेल्या या नेत्याने या खात्याला वेगळा आयाम दिला. आदर्श गाव हिवरे बाजारशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. गावातील विकासाच्या प्रक्रियेत त्यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. हिवरेबाजारला ते येऊन त्यांनी अनेकदा प्रत्यक्ष पाहणी केली होती. या कामात त्यांची प्रेरणा मोलाची होती.
आमदार डॉ. सुधीर तांबे- आर. आर. पाटील यांच्या निधनाने ग्रामीण भागातील विकासाचा चेहरा हरपला आहे. अशाच भागातील गरीब कुटुंबातून स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या पाटील यांनी राज्यात स्वत:च्या कार्याचा ठसा उमटवला होता. भाषेवर प्रभुत्व व विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे त्यांचा शब्द न् शब्द समोरच्याला जाऊन भिडत असे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग– मूर्ती लहान पण कीर्ती महान असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. स्वत:च्या जीवनात त्यांनी अत्यंत प्रतिकूलतेचा सामना करत शिक्षण पूर्ण केले तसेच राजकारणात प्रवेश केला. विधानसभेत मला त्यांच्या समवेत सन १९९५ ते २००० दरम्यान काम करण्याचा योग आला. त्यांची भाषणे उत्कृष्ट संसदपटूची असत, अनेक वेळा मंत्रिपदे मिळूनही ते सर्वसामान्यच राहिले.
प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर- लोकसहभागातून स्वच्छता व विकास कसा करायचा याचे उदाहरण त्यांनी ग्रामविकास खात्याची जबाबदारी पेलताना संपूर्ण देशाला दिले. तंटामुक्तीच्या माध्यमातून लाखो खटले निकाली काढताना पोलीस खात्याची प्रतिमा उजळ केली. आपल्या कामातूनच त्यांनी लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनाने केवळ पक्षाचीच नाहीतर महाराष्ट्राचीही हानी झाली आहे.
अॅड. शारदा लगड– उत्तम संसदपटू असलेले आर. आर. पाटील निष्कलंक व चारित्र्यसंपन्न होते, असे व्यक्तिमत्त्व विरळच असते. त्यांच्या निधनाने केवळ पक्षाचीच नाहीतर महाराष्ट्राचीही हानी झाली आहे.