प्रदीप नणंदकर,  लोकसत्ता

लातूर : ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे पार पडले ,केवळ तीन महिन्यांच्या तयारीत हे संमेलन घेण्यात आले व आयोजकांनी ते यशस्वी करून दाखवले त्याबद्दल आयोजकांचे कौतुक होत आहे. महाराष्ट्राच्या अगदी कोपऱ्यातल्या तालुक्याच्या ठिकाणी हे संमेलन पार पडले त्यामुळेही छोटय़ा गावातील आयोजनाची चर्चा चांगली रंगली. या संमेलनात संमेलनापूर्वी दोन दिवस महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीरच्या हीरक महोत्सवाचे औचित्य साधून संगीतकार अजय-अतुल यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम व चला हवा येऊ द्या या झी टीव्ही च्या कलाकारांचा कार्यक्रम घेण्यात आला . या दोन्ही कार्यक्रमांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला असताना तुलनेत प्रत्यक्ष संमेलनात मात्र उपस्थिती कमीच होती.

साहित्य संमेलन म्हणजे मनोरंजन असा परिसरातील ग्रामीण भागातील लोकांचा समज  झाला असावा. संमेलनाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते त्यामुळे आयोजकांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अधिकाधिक लोक यावेत यासाठी परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याही  कार्यक्रमाला चांगली गर्दी होती. मात्र या दरम्यानच्या काळात परिसंवाद व अन्य कार्यक्रमाला म्हणावी तशी प्रेक्षकांची उपस्थिती  नव्हती .लोक संमेलनस्थळी येऊन जात होते मात्र दर्दीची संख्या कमी व गर्दी अधिक अशीच स्थिती राहिली .या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे तर संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, संमेलनाचे कार्यवाह रामचंद्र तिरुके हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते एका अर्थाने राष्ट्रवादी व भाजप यांची युती झाल्याचे चित्र संमेलनाच्या आयोजनामध्ये दिसून आले. 

या संमेलनात मनोरंजनाच्या कार्यक्रमावर कोटय़वधी रुपयांचा खर्च झाला मात्र  पाचशे किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या साहित्यिकाला केवळ सातशे रुपयाचे मानधन दिले जाते याबद्दल उदगीर येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अन्य कार्यक्रमावर प्रचंड खर्च केला जातो त्या तुलनेत साहित्यिकांवरती खर्च केला जात नाही याबद्दलही अनेकांनी भावना व्यक्त केल्या; संमेलनातील परिसंवाद व अन्य बाबतीतील चर्चेपेक्षा राजकीय मंडळीच्या भाषणावरच आधी चर्चा रंगल्या.  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी कोकणी व मराठीचा वाद उकरून काढला .ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक दामोदर मावजो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासमोर मराठीत अनेक मोठे लेखक असताना अन्य भाषेतील लेखकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याला आपला व्यक्तिगत विरोध होता अशी भूमिका त्यांनी मांडली. अकारण कोकणी मराठीचा वाद उपस्थित केला त्या वादाला दामोदर मावजो यांनी सौम्य शब्दात उत्तर दिले तर शरद पवारांनी असा वाद उकरून काढणे अप्रस्तुत असल्याची टिप्पणी केली. हे संमेलन बिगरमोसमी वेळेत घेण्यात आले ऐन उन्हाळय़ात हे संमेलन उदगीर येथे भरले गेल्यामुळे साहित्यिकांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील साहित्यिक रसिकांनी याकडे पाठ फिरवल्याचे आढळून आले. उन्हाळय़ाचा त्रास सहन न होण्याची भीती अनेकांना होती, एसटी महामंडळाच्या संपाचा फटकाही ग्रामीण भागातील साहित्य रसिकांना सहन करावा लागला .या संमेलनाच्या वेळी उदगीरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनात पुरणपोळी, आमरसाचा बेत याची चर्चा होती तर विद्रोही च्या संमेलनात मूठभर धान्य व एक रुपया मागून संमेलन भरवण्यात आले त्यामुळे तिकडे सामान्य माणसांच्या प्रश्नांची चर्चा होती .

 संमेलन ग्रामपंचायतीच्या हद्दीत भरल्यामुळे आयोजकांनी स्वत:चे कौतुक करून घेतले एका अर्थाने ते योग्य आहे मात्र संमेलनस्थळी राज्यभरातून २५० पेक्षा अधिक स्टॉल पुस्तक विक्रेत्यांचे होते राज्यातील अनेक प्रकाशकांची मात्र साहित्य संमेलनाने निराशा केली. तीन दिवसांच्या स्टॉलचे भाडे देण्यापुरती देखील पुस्तकांची विक्री झाली नाही त्यामुळे आतबट्टय़ाचा व्यवहार झाल्याची खंत राज्यभरातील अनेक प्रकाशकांनी बोलून दाखवली.

सांस्कृतिक मंत्र्यांची उदासीनता

लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख हे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत. आयोजकांनी त्यांच्यावर मुख्य सल्लागाराची जबाबदारी टाकली होती. मात्र देशमुख हे फारसे सक्रिय दिसले नाहीत. कारण आयोजकांनी नेमकी  तयारी कशी केली आहे हे पाहण्यासाठी ते उदगीरमध्ये एकदाही फिरकले नाहीत . आपल्या जिल्ह्यात संमेलन होत असताना सांस्कृतिक मंत्र्याने एका अर्थाने आयोजकांची उपेक्षा केली .संमेलनाच्या उद्घाटन व समारोपाच्या कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावण्याचे औचित्य दाखवले मात्र संमेलनाबाबतीत त्यांनी दाखवलेली उदासीनता कार्यकर्त्यांना खटकली.  त्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही संमेलनाच्या आयोजनात फारसा सहभाग दिला नाही.