जळगाव: महागाईच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भेटीचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर पुणे येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारला. पक्ष किंवा राजकीय विचार काहीही असो; पण महिलांचा अवमान कोणत्याच परिस्थितीत सहन करणार नाही.  कुठल्याही पक्षाच्या महिलेवर हात उगारला तर हात तोडून त्याच्या हातात देईन, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी महागाई विरोधात येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुळे यांनी मार्गदर्शन केले. भाजपच्या एका नेत्याने महिलेवर हात उगारला. ही आपली संस्कृती आहे का ? यापुढे जर असा कुठेही प्रकार झाला तर आपण स्वत: पुढे येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ही प्रवृत्ती कुठेतरी थांबायला हवी. कायद्याने आपण न्याय मागणार आहोत. जोपर्यंत त्या तिघांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असे खासदार सुळे यांनी सांगितले.

मराठीवर अन्याय नको

सध्या अनेकजण हिंदीत भाषण करू लागले आहेत. मराठीचा तर त्यांना विसर पडला आहे. हिंदीत भाषण करा; पण आमच्या मायमराठीवर अन्याय करू नका. मराठी ही आपली माय आहे, जो आपल्या आईला न्याय देऊ शकत नाही, तो इतरांना काय न्याय देणार, असा प्रश्न उपस्थित करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टोला लगावला. सुषमा स्वराज या भाजपच्या मोठय़ा नेत्या होत्या. परंतु, सत्ता मिळाल्यावर त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. जो स्वत:च्या घरातील महिलांवर अन्याय करतो, तो तुमचा काय विचार करणार, असा प्रश्न उपस्थित करीत याचा विचार करायची वेळ आली असल्याचे त्यांनी ठणकावले.