शिकार करून वाघाच्या कातडय़ाची तस्करी, तेलंगणातील चौघा आंतरराज्य तस्करांना अटक

आरोपींकडून १५ लाख रुपये किमतीचे पट्टेदार वाघाचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

तेलंगणातील तस्कारांकडून जप्त करण्यात आलेले वाघाचे कातडे. 

वाघाची शिकार करून कातडय़ाची तस्करी करणाऱ्या लगतच्या तेलंगणातील चार आंतरराज्य तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह अटक केल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. यावेळी आरोपींकडून १५ लाख रुपये किमतीचे पट्टेदार वाघाचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

येथील स्थानिक गुन्हे शाखेला एका अज्ञात इसमाने तेलंगणातील काही इसम वाघाच्या कातडे विक्रीसाठी गोंडपिंपरी मार्गे येणार असल्याची माहिती दिली. या माहितीवरून जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण व अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र वैरागडे, दौलत चालखुरे, नितीन जाधव, पदमाकर भोयर, गजानन निमकर, अरुण खारकर, विजय वैद्य, गणेश भोयर, जावेद सिद्दिकी यांनी मौजा गोंडपिंपरी-आष्टी मार्गावरील विठ्ठलवाडा गावाजवळ थांबून आष्टीकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली. याच वेळी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीनुसार त्या वर्णनाची एक हिरो एचएफ डिलक्स एपी-०१-एफ-७८५१ या मोटरसायकलवर चार इसम बसून येतांना दिसले. यावरील चार पैकी एका इसमाच्या हातात मोठी पांढऱ्या रंगाची बॅग होती. त्यामुळे पोलिसांनी हे वाहन थांबवून त्या इसमांची चौकशी केली असता त्यात पट्टेदार वाघाचे कातडे निघाले. यावेळी पोलिसांनी लागलीच मोटरसायकलवरील आरोपी दत्ता पांडूरंग येलमुले (रा. ताडपल्ली, ता. शिरपूर, जि. आदिलाबाद), किसन नरसय्या येराबाटी (रा. पेद्दापल्ली, ता. सिरपूर, जि. आदिलाबाद), अशोक चंद्रय्या इमाडचेट्टी (वरंगल) व तुळशीराम गणपती अलोने (ताडपल्ली, ता. सिरपूर, जि.आदिलाबाद) यांना अटक केली.

या पट्टेदार वाघाच्या कातडीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १५ लाख रुपये असल्याची माहिती त्यांनीच दिली. हे कातडे नेमके कुठून आले, याबाबत चौकशी केली असता चौघांनीही समाधानकारक उत्तर न दिल्याने व कोणताही परवाना नसल्याने त्यांना अवैधरीत्या वाघाचे कातडे ताब्यात बाळगून आंतरराज्यीय वाहतूक करतांना वाघाचे कातडे व मोटरसायकल जप्त केली.

या चौघांनीही मध्य चांदा वन विभागाअंतर्गत धाबा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे. या आंतरराज्यीय वनतस्कर टोळीच्या अटकेमुळे वनखात्यात खळबळ उडाली आहे. तेलंगणा व आंध्रप्रदेशातील तस्कर राज्यातील व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात येऊन शिकारी करून जात असल्याची चर्चा आहे.

कातडय़ावर म्हैसूरचा स्टॅम्प

दरम्यान, यासंदर्भात चंद्रपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे म्हणाले की, प्रथमदर्शनी वाघाचे कातडे जुने दिसत आहे. या चौघांनी कुणाच्या घरून किंवा एखाद्या ठिकाणाहून ते चोरले असावे. त्यानंतर हे विक्रीसाठी निघाले असावे, असा एक अंदाज आहे. या कातडय़ावर म्हैसूर येथील स्टॅम्प आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी सहायक उपवनसंरक्षक अभय बडकेलवार व वन विभागाच्या वकिलांनी धाबा येथे अधिक माहिती व चौकशी सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hunting tiger for smuggling tiger skin in chandrapur