प्रबोध देशपांडे

अकोला : पाण्यात युरिया टाकून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वनविभागाने १० जूनला अटक केली. आलेगांव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिंपरहोळी (भाग-२) क्षेत्रातील राखीव वनामध्ये गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना १२ माकडे, एक निलगाय, काळवीट मृतावस्थेत आढळून आले होते. निलगायीचे मागचे पाय व शीर कापून नेले होते. शिकारीच्या अंगाने चौकशी केली असता वनकर्मचाऱ्यांनी संशयित आरोपी मधुकर कचरू लढाड याच्या शेतात शोध घेतला. तेथे रक्ताने माखलेली सुरी, दगड व अन्य साहित्य सापडले. आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. नैसर्गिक पाणवठ्यात युरिया टाकून शिकार केली व निलगायीचे मांस खाण्याच्या उद्देशाने कापून नेल्याचे सांगितले. त्याच्यासोबत गोविंदा झांगोजी ससाने व संतोष वसंता ससाने हे अन्य दोन आरोपी असल्याची माहिती दिली. त्यांना १० जून रोजी अटक करण्यात आली. सर्व आरोपींना पातूर प्रथम श्रेणी न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली.

“आलेगांव वनपरिक्षेत्रांतर्गत पाण्यात युरिया टाकून वन्यप्राणी व पक्षी यांची हत्या करण्यात आलेली आहे. याप्रकरणी आरोपींना पकडण्यात आले असून यात इतर आरोपी सहभागी आहेत का? याचा तपास सुरू आहे.” 

– विश्वनाथ एस. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगांव.