‘आपण दोघे सासू आणि सासऱ्यांपासून वेगळं राहूया’ असा पत्नीने लावलेला तगादा आणि सतत चारित्र्यावर घेतला गेलेला संशय यामुळे मानसिक छळाला कंटाळून पुण्यातील धनकवडी भागात राहणार्‍या एका ३० वर्षीय पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरद नरेंद्र भोसले असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तर पत्नी प्रियांका शरद भोसले (वय २८), सासरे शंकर शिंदे (वय ५६), सासू रोहिणी शिंदे आणि मेहुणा मनीष ऊर्फ गणेश शिंदे (रा. कवडीपाट लोणी काळभोर) अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आणि प्रियांका या दोघांच्या लग्नाला साधारण तीन वर्ष झाली. तेव्हापासून दोघांमध्ये वाद व्हायचे. पत्नी आणि सासरची मंडळींनी शरदकडे सासू आणि सासर्‍यापासून वेगळे राहण्याचा तगादा लावून धरला. हे सुरू असताना पत्नी प्रियांका ही शरदच्या चारित्र्यावर संशय घेऊन देखील भांडण करायची. त्यातून प्रियांका ही माहेरी राहण्यास गेली. यावेळी देखील शरदला सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास सुरूच होता. या त्रासाला कंटाळून शरद याने धनकवडी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्ये कारण नमूद

शरद याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात पत्नी, तसंच सासरच्या मंडळीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं म्हटलं आहे. तर या प्रकरणी मयत शरद यांचे वडील नरेंद्र भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी प्रियांका शरद भोसले, सासरे शंकर शिंदे, सासू रोहिणी शिंदे आणि मेहुणा मनीष ऊर्फ गणेश शिंदे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सहकारनगर पोलिसांनी सांगितलं.