पत्त्याचा जुगार व दारूचे व्यसन जडलेल्या पतीने पत्नीसह आपल्या दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या केली. धर्माबाद तालुक्यातील कारेगाव येथील हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.
हौसाजी जगदंबे (वय ३६), त्याची पत्नी रेखा (वय ३०) व दोन मुले दुर्गा (वय ५) व रामेश्वर (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. कारेगाव येथील हौसाजी जगदंबे याचा ७-८ वर्षांपूर्वी वाघलवाडा येथील विवाह झाला होता. विवाहानंतर काही काळ सुखाचा गेल्यानंतर हौसाजीला दारू-पत्ते खेळण्याचे व्यसन लागले. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा खटके उडाले, वादही झाला. या वादातून त्याने पत्नीला मारहाण केली. काही दिवसांपूर्वी हौसाजीची दारू सुटावी, यासाठी बुलढाणा येथील व्यसनमुक्ती केंद्रात नेले होते. दोन-तीन दिवस त्याने मद्यप्राशन केले नाही. व्यसनमुक्ती केंद्रात असताना त्याची मुले दुर्गा व रामेश्वर आजोळी होती.
जावयाची दारू सुटल्याचे गृहीत धरून शनिवारी दोन मुलींसह पत्नी कारेगाव येथे सासुरवाडीत आली. पण त्यांच्यासाठी शनिवारची रात्र वैऱ्याची ठरली. रात्री नऊच्या दरम्यान हौसाजी दारू पिऊन आला. यानंतर त्याचे पत्नी रेखाशी भांडण झाले. दारूच्या नशेत तर्रर हौसाजीने वाद घातल्यानंतर रेखा दोन चिमुकल्यांना घेऊन झोपी गेली. मात्र, मध्यरात्रीनंतर एकच्या दरम्यान मद्यपि जगदंबे याने पत्नी व दोन मुलांचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. नशेत असल्याने त्याला आपल्या कृष्णकृत्याचा पश्चात्ताप झाला नाही. सकाळी आठपर्यंत तिघांच्या मृतदेहांजवळ तो बसून होता. सकाळी ग्रामस्थांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी दार उघडले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांनी हौसाजी जगदंबे याला तात्काळ पोलिसांच्या हवाली केले.
धर्माबाद पोलिसांना माहिती मिळताच अधीक्षक परमजितसिंग दहिया यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. पत्नी व दोन मुलांची हत्या करणारा जगदंबे सकाळपर्यंत दारूच्या नशेतच असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्याला नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आले.